गायनात करिअरसाठी जिद्द, चिकाटी हवी , उत्तरा केळकर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:31 AM2019-06-26T00:31:50+5:302019-06-26T00:33:13+5:30

आपले ध्येय निश्चित असेल तर उच्च शिखरावर पोहोचता येते. माझे पार्श्वगायिकेचे ध्येय निश्चित असल्याने त्यादृष्टीने मेहनत केली.

Uttara Kelkar advice for career in singing | गायनात करिअरसाठी जिद्द, चिकाटी हवी , उत्तरा केळकर यांचा सल्ला

गायनात करिअरसाठी जिद्द, चिकाटी हवी , उत्तरा केळकर यांचा सल्ला

Next

डोंबिवली : आपले ध्येय निश्चित असेल तर उच्च शिखरावर पोहोचता येते. माझे पार्श्वगायिकेचे ध्येय निश्चित असल्याने त्यादृष्टीने मेहनत केली. गायनात करिअर करू इच्छिणाऱ्यांना जिद्द आणि चिकाटीची कास धरावी लागेल, असा मोलाचा सल्ला सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांनी दिला.
‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे ‘पुन्हा एक कलाकार, एक संध्याकाळ’ या कार्यक्रमांतर्गत रविवारी येथील सुयोग मंगल कार्यालयात केळकर यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ गायक वसंत आजगावकर यांच्या हस्ते केळकर यांचा सन्मान करण्यात आला.

केळकर म्हणाल्या, आॅडिओ उद्योग काळाच्या ओघात मागे पडल्याने नवीन मुलांना नवनवीन गाण्यासाठी संधी मिळत नाही. आमच्या काळात आम्ही नवनवीन गाणी गायिली. त्यामुळे प्रसिद्धी मिळाली आणि नाव झाले. यशवंत देव, फिरोज दस्तुर, श्रीकांत ठाकरे या माझ्या गुरूंनी माझ्यातील कलागुणांना बहर आणला. प्रत्येक गाणे जबाबदारीने गायल्याने करिअरमध्ये पुढची गाणी आपोआप मिळत गेली. गायनाचा रियाज हा सातत्याने चालू ठेवला पाहिजे.
आपले वय जसे वाढत जाते, तसा आवाजाचा स्पीच खाली येतो. स्नायू थकायला लागतात. त्यासाठी स्पीच थेरपिस्टकडे जाऊन योग्य तो व्यायाम करण्याची गरज आहे. सुगम संगीतात करिअर करायचे असल्यास शास्त्रीय संगीताचे ज्ञानही आवश्यक असते. सुगम संगीत चांगल्या तोडीचे गाता येण्यासाठी ती गाणी सतत ऐकली पाहिजे. भावगीते ऐकली पाहिजे. ती गाणी सतत गुणगुणली पाहिजे. गाणी रेकॉर्डिंगमध्ये डबिंग पद्धत सुरू झाल्यावर ती कमी वेळेत पूर्ण होऊ लागली. चाल आॅन द स्पॉट सांगितली की, ती विसरायला होते. परंतु, रियाज करून गाणी गायल्यास ती कायम लक्षात राहतात. थंड आणि तेलकट वस्तूंचे सेवन न करण्याचा नियम मी कायम पाळत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रोते पाहून मी गाण्यांची निवड करते. तरुण प्रेक्षक असल्यास उडत्या गाण्यांना प्राधान्य देते, तर वयोवृद्ध प्रेक्षकांसाठी भावगीतांची निवड करते. प्रेक्षकांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याबद्दल विचारताच त्यांनी त्या दोघीही सर्वच दृष्टीने श्रेष्ठ असल्याने त्यांच्याबद्दल काहीही बोलण्याची माझी पात्रता नसल्याचे त्यांनी नमूद केले. कुटुंबाबद्दल बोलताना केळकर म्हणाल्या, मी पार्श्वगायिका म्हणून नाव कमवावे, अशी माझ्या पतींची इच्छा होती. त्यासाठी ते नेहमीच मला पाठिंबा देत असत. सासूसासरे हौशी असल्याने त्यांनीही कायम साथ दिली. त्याचबरोबर घरातील गडीमाणसांनी माझा संसार सांभाळला.
लावणी या गायनप्रकाराचे शिक्षण मला संगीतकार राम कदम आणि विश्वनाथ मोरे यांनी दिले. डॉ. अशोक रानडे व पु.ल. देशपांडे यांचा सहभाग असलेल्या ‘बैठकीची लावणी’ या कार्यक्रमात वेगळ्या शैलीतील, वेगळ्या तालातील, दुर्मीळ अशा लावण्या गाण्याची संधी मिळाली. लावणी गाताना संकोच बाळगू नये व शब्दांना प्राधान्य द्यावे, असा सल्लाही केळकर यांनी दिला.
केळकर यांनी ‘चिकमोत्यांची माळ’, ‘खोप्यामध्ये खोपा’, ‘बंधू येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला’, यासारखी गाणी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

१४ गाणी गाण्याची संधी मिळाली
करिअरविषयक किस्से सांगताना त्या म्हणाल्या, की भीमसेन जोशी यांनी बहिणाबार्इंची दोन गाणी गाण्यासाठी मला बोलावले होते. त्यावेळी जोशी यांनी सांगितले की, ही गाणी खूप चांगली गायल्यास पुढची १४ गाणी तुला गाण्याची संधी मिळेल. त्यानुसार, मी ती दोन गाणी उत्तमरीत्या सादर केली आणि पुढची १४ ही गाणी माझ्याच आवाजात रेकार्ड झाली.

Web Title: Uttara Kelkar advice for career in singing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.