शिक्षण, नोकरीनिमित्त परदेशात जाणाऱ्यांचे लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:30 AM2021-05-30T04:30:42+5:302021-05-30T04:30:42+5:30
ठाणे : महापालिकेच्या हद्दीतील बहुतांश तरुण-तरुणी उच्च शिक्षणासाठी तसेच नोकरीनिमित्त परदेशात जातात. परंतु, सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे ...
ठाणे : महापालिकेच्या हद्दीतील बहुतांश तरुण-तरुणी उच्च शिक्षणासाठी तसेच नोकरीनिमित्त परदेशात जातात. परंतु, सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद असल्यामुळे त्यांचे लसीकरण रखडले आहे. पर्यायाने त्यांना परदेशात प्रवास करणे शक्य नाही व त्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. यावर मार्ग काढून राज्य सरकारने मुंबईत अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्याच धर्तीवर आपण ठाण्यातही परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असे केंद्र सुरू करावे, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्याबाबतची सूचना केली आहे. या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महापालिका क्षेत्रात दोन स्वतंत्र केंद्रे सुरू केली आहेत. त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेतर्फे परदेशात शिक्षणासाठी व नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र केंद्र सुरू करावे. अशा परदेशात जाणाऱ्या व्यक्तीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना प्राधान्यक्रमाने लस देण्याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत, असेही त्यांनी यात नमूद केले आहे.
---------------