शनिवारी ठामपा क्षेत्रात ५० केंद्रात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:39 AM2021-04-25T04:39:35+5:302021-04-25T04:39:35+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण क्षेत्रात लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरण मोहिमेला शुक्रवारी ब्रेक लागला होता. त्यामुळे लसींचा साठा ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण क्षेत्रात लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरण मोहिमेला शुक्रवारी ब्रेक लागला होता. त्यामुळे लसींचा साठा उपलब्ध न झाल्यास शनिवारीदेखील लसीकरण मोहीम बंद राहणार असल्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत होती; मात्र शुक्रवारी सायंकाळी सुमारे ५० हजार लसींचा साठा प्राप्त झाल्याने शनिवारी पुन्हा वेगाने लसीकरणास सुरुवात झाली. ठाणे महापालिकेनेही कमी केलेल्या लसीकरण केंद्राच्या संख्येत शनिवारी वाढ करून ५० केंद्रांच्या माध्यमातून मोहीम राबविली.
दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या आढळून येत आहे. त्यात कोरोनावरील लसीकरण करण्याची मोहीमदेखील व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अपुऱ्या लसींमुळे या मोहिमेला ब्रेक लागण्याची दुसऱ्यांदा वेळ ओढवली आहे. यापूर्वी अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाने वीकेंड टाळेबंदीचे कारण पुढे करून महापालिका क्षेत्रात दोन दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवली होती. त्यात नुकतेच गुरुवारी लसीकरण केंद्राची संख्या ५६ वरून आठवर आणली होती. त्याचा अतिरिक्त ताण जिल्हा सामान्य रुग्णालयावर आल्याने दोन दिवसांचा लसींचा साठा एका दिवसात संपुष्टात आला. त्यामुळे शुक्रवारी जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. त्यात जर लसीचा साठा उपलब्ध न झाल्यास शनिवारीदेखील लसीकरण मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यासाठी ५० हजार लसींचा साठा उपलब्ध झाला. त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेसाठी १० हजार लसी देण्यात आल्या. त्यामुळे शनिवारी ठामपा क्षेत्रात पुन्हा जोमाने लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्यात मागील दोन दिवसांपासून आठ आणि पाचवर आलेली लसीकरण केंद्रांची संख्या शनिवारी पुन्हा ५० वर गेल्याचे दिसून आले. यामध्ये ३७ शासकीय आणि १३ खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.