1 मे पासून लसीकरण केंद्रे वाढविणार; पालघर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 11:42 PM2021-04-28T23:42:50+5:302021-04-28T23:43:06+5:30
पालघर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज : आजवर २,०७,८४९ व्यक्तींना दिले डोस
पंकज राऊत
बोईसर : पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवक आणि फ्रन्टलाइन वर्कर अशा सुमारे ३४ हजार व्यक्तींना कोरोनाची लस दिल्यानंतर प्रथम ६० व त्यानंतर ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू करून आतापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून जिल्ह्यात एकूण २ लाख ७ हजार ८४९ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्रे वाढवण्यात येतील, असे आरोग्य विभागातून
सांगण्यात आले.
पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुके असून जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे २० ते २२ लाख आहे. त्यामध्ये ४५ ते ६० वर्षांवरील व्यक्तींची लोकसंख्या सुमारे आठ ते साडेआठ लाख आहे म्हणजेच सुमारे २५ टक्के व्यक्तींना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ७१ शासकीय तर १७ खासगी अशी मिळून एकूण ८८ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती, मात्र लसींचा तुटवड्याअभावी सध्या खासगी लसीकरण केंद्रे बंद ठेवली आहेत.
दररोज साधारणतः ६,६०० व्यक्तींना लस
येत्या १ मे पासून संपूर्ण राज्यासह पालघर जिल्ह्यात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी शासनाकडून जसजशी लस उपलब्ध होत जाईल, तशी लसीकरण मोहीम सुरू राहील, अशी माहिती जिल्ह्याच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोविल्डशिल्ड १ लाख ९८ हजार तर कोवॅक्सिनचे ६,००० लसींचे डोस उपलब्ध झाले असून लसीकरणाच्या सत्रातून दैनंदिन साधारणतः ६,६०० व्यक्तींना लस दिली गेली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ७४ हजार ६४५ जणांना पहिला तर ३२ हजार २०४ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. वसई ग्रामीणसह एकूण आठ तालुक्यांतील १ लाख १६ हजार १८१ तर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील ९१ हजार ६६८ व्यक्तींना लस दिली आहे, तर जिल्ह्यात १८ ते ४५ वयोगटातील सुमारे अडीच ते तीन लाख व्यक्ती असून त्यांना खासगी केंद्रांतून लस दिली जाऊ शकते.