लसीकरण केंद्रे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:39 AM2021-04-06T04:39:41+5:302021-04-06T04:39:41+5:30
ठाणे : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने लसीकरण केंद्र वाढवून तेथे लसीकरण सुरू करण्यावर जास्त ...
ठाणे : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने लसीकरण केंद्र वाढवून तेथे लसीकरण सुरू करण्यावर जास्त भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यातच ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रे ही सार्वजनिक सुटीच्या दिवशी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे हे महिनाभर सुरू राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एका दिवसात जिल्ह्यात पाच ते सहा हजार रुग्ण नोंदविले जात आहेत. आतापर्यंतच्या एकूण रुग्णांचा आकडा हा साडेतीन लाखांच्या जवळपास पोहोचला आहे तर दुसरीकडे मृतांचा आकडा ही १५ ते १९ असा होत आहे. जिल्ह्यात लसीकरणावर भर देण्यात येत असून जवळपास पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. लसीचा साठा पुरेसा असून नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे. सुरुवातीला लसीकरण केंद्र हे सुटीच्या दिवशी बंद राहत होते. आता सुटीच्या दिवशीही ही केंद्रे सुरू ठेवली जात आहेत. जिल्ह्यात सध्या १६३ लसीकरण केंद्रे सुरू असून जिल्ह्यात दिवसाला १९ ते २० हजार जणांना लस देण्याचे टार्गेट आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार नाही, याचीही काळजी घेण्यात येत आहे. यापूर्वी दिवसाला एका केंद्रावर १०० जणांना लस देण्याचे टार्गेट होते. ते आता राहिलेले नाही. केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना शासकीय नियमानुसार लस दिली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
काेट
२४ तास लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्याचा विचार होता. मात्र सध्या वाढत असलेल्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ लागला आहे. पण, लसीकरणाची सेवा चोवीस तास देता येत नसली तरी यापुढे लसीकरण सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे महिनाभर तरी लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे