गर्दीच्या धास्तीने खासगी रुग्णालयात पैसे मोजून घेतली जातेय लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:45 AM2021-07-14T04:45:00+5:302021-07-14T04:45:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सरकारकडून पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक खासगी रुग्णालयात पैसे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सरकारकडून पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक खासगी रुग्णालयात पैसे देऊन लस घेण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरात चार खासगी रुग्णालयांतून सशुल्क लसीकरण केले जात असून, त्याची माहिती सरकारच्या पोर्टलवर पाठविली जात आहे.
महापालिका हद्दीत लसीकरणास सुरुवात झाली, तेव्हा जानेवारीपासून लसीचे डोस काही प्रमाणात येत होते. लसीकरण सुरू झाले. मात्र त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यावेळी नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली. आता तिसरी लाट येऊ घातली आहे. लस आली असली तरी कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर झालेले नाही. त्यामुळे लसीकरणाकडे नागरिकांचा ओढा आहे. सरकारकडून पुरेशी लस मिळत नसल्याने सरकारी लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होते. लस प्रत्येकाला हवी आहे. शहरातील सरकारी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी उसळणारी गर्दी पाहता, सामान्य नागरिक वैतागला आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही, ते सरकारी लसीकरणावर अवलंबून आहेत. मात्र सरकारी रुग्णालायत डोस उपलब्ध होत नसल्याने गर्दीत रांग लावण्याऐवजी खासगी रुग्णालयात सशुल्क लस घेण्याकडे नागरिक प्रयत्नशील आहेत. काही खासगी रुग्णालयातून कोविशिल्डकरिता ७८० रुपये तर कोव्हॅक्सिनसाठी १४१० रुपये शुल्क आकारले जात आहे. मनसे आणि भाजपने लस खरेदी करून ती नागरिकांना मोफत दिली आहे.
-----------------------
आतापर्यंतचे लसीकरण
पहिला डोस-२ लाख ७४ हजार ८६१
दुसरा डोस-७७ हजार १७०
------------------------
लसीकरण करणारी खासगी रुग्णालये
ममता हॉस्पिटल
एम्स हॉस्पिटल
श्वास हॉस्पिटल
नोबेल हॉस्पिटल
खासगी रुग्णालयात किती लसीकरण झाले, याची नोंद सरकारच्या लसीकरण पोर्टवल करण्यात येते. त्यामुळे त्याची माहिती केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडे नसते.
-------------------------
सरकारी रुग्णालयात लस का नाही ?
१.कल्याण डोंबिवलीत जानेवारी २०२१ मध्ये लसीकरण सुरू झाले.
२. सरकारकडून पुरेसे लसीचे डोस महापालिकेस उपलब्ध होत नाही. त्यामुळे सरकार रुग्णालयात लस नाही.
३. लस कमी आणि लाभार्थी जास्त असे व्यस्त प्रमाण आहे. त्यामुळे लसीकरणासाठी सरकारी केंद्रावर गर्दी होते.
४. महापालिकेने काही दिवसांपूर्वीच ३३ खासगी मान्यताप्राप्त रुग्णालयांना सशुल्क लसीकरणास परवानगी दिली होती. त्यानुसार रुग्णालये लसीकरणाचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे सादर करीत आहेत.
५, सशुल्क लसीकरण सर्वप्रथम पलावा गृहसंकुलात रिलायन्स रुग्णालयाने केले होते. त्याठिकाणी जवळपास तीन हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
------------------------
कोरोना कोण आणणार?
१. मी अद्याप लस घेतली नाही. कारण सरकारी केंद्रावर गर्दी आहे. गर्दीत कोण जाणार आणि कोरोना घरी आणणार. त्यामुळे खासगी रुग्णालयात लस घेणार आहे.
-डेव्हीड जाजू
२. मला लस घ्यायची आहे. मात्र सरकारी केंद्रावर गर्दी आणि नियोजन नाही. लस संपल्यावर रांगेत उभे असूनदेखील घरी पाठविले जाते. त्यामुळे सशुल्क लस घेणार आहे.
-शिल्पा करणकाळ
-------------------------