साडेआठ हजार जणांचे रोज लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:39 AM2021-01-08T01:39:34+5:302021-01-08T01:39:42+5:30
आज ठिकठिकाणी ड्राय रन : महापालिकांसह ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज
- सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्हाभरात एका दिवशी आठ हजार ५०० जणांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६६ हजार ४४७ जणांनी या लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. या लसीकरणाची रंगीत तालीम येथील सिव्हील रुग्णालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ जानेवारीला सकाळी ८.३० वाजेपासून सुरू करण्यात येणार आहे. याप्रमाणेच शहापूर येथील ग्रामीण रुग्णालय व दिवे अंजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, उल्हासनगर महानगरपालिकेकडूनही लसीकरणासाठी ड्राय रन पार पडणार आहे.
जिल्ह्यातील एका रुग्णालयात दरदिवशी १०० जणांना कोरोनावर मात करणारी लस देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्ह्यात सुमारे ८५० लसीकरण केंद्रांची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील या ठिकठिकाणच्या केंद्रांद्वारे जिल्हाभरात एका दिवशी आठ हजार ५०० जणांना लस देण्यात
येणार आहे. या लसींच्या साठवणुकीसाठी जिल्ह्यात तब्बल १९० आइसलाइन्ड रेफ्रीजरेटर, १९७ डीपफ्रीजर आणि १९९ कोल्ड बाॅक्सची व्यवस्था ठाणे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने केली आहे.
मुंबई महानगराला जिल्हा लागून असल्यामुळे कोरोना महामारीचा फटका मुंबईच्या तुलनेत ठाण्यालाही बसला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ४५ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. तर, मृत्यू सहा हजार झाले आहेत.
ठाण्यात घोडबंदर रोडवर रंगीत तालीम
ठाणे : ठाणे शहरात शुक्रवारी जिल्हा रुग्णालय आणि ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदर रोडवरील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर कोविड १९ लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे. जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर रोझा गार्डनिया येथे महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत हा ड्राय रन होणार आहे.
या ठिकाणी लसीकरणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी प्रतीक्षा कक्ष, नोंदणीकक्ष आणि लसीकरण कक्ष आदी सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचबरोबर लसीकरण झाल्यानंतर आब्जर्वेशन कक्षही निर्माण केला आहे.
या ड्राय रनसाठी रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर काम करणाऱ्या एकूण २५ कर्मचाऱ्यांची निवड केली असून त्यांना तसे संदेश पाठविले आहेत. त्यांनी कोणत्या वेळेत उपस्थित राहायचे आहे ती वेळही कळविली आहे. लसीकरण करण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची माहिती केंद्र शासनाच्या को-विन या ॲपवर अद्ययावत केली असून यामध्ये आरोग्य कर्मचारी, डॅाक्टर्स आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
प्रत्यक्ष मोहिमेत फायदा
लसीकरणाची शुक्रवारी रंगीत तालीम केली जाणार असून, त्याचा फायदा प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेच्या वेळी होईल. या तालिमीतून मोहिमेतील त्रुटी शोधण्यास मदत होणार आहे.