मीरा-भाईंदरमध्ये १३ दिवसांपासून लसीकरण ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:29+5:302021-07-07T04:50:29+5:30
मीरारोड : तिसऱ्या लाटेचा धाेका ओळखून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी १८ व त्यावरील सर्वच नागरिकांना लस देण्याचे जाहीर केले. ...
मीरारोड : तिसऱ्या लाटेचा धाेका ओळखून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी १८ व त्यावरील सर्वच नागरिकांना लस देण्याचे जाहीर केले. मात्र, तेवढ्या प्रमाणात लससाठाच उपलब्ध हाेत नसल्यामुळे मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील लसीकरण १३ दिवसांपासून ठप्प पडले आहे. त्यामुळे तब्बल २२ हजार नागरिक काेविशिल्डच्या दुसऱ्या डाेसच्या प्रतीक्षेत आहेत.
केंद्र शासनाकडून पुरेशा लसींचा पुरवठाच होत नसल्याने २४ जूनपासून लसीकरण माेहीम ठप्प आहे. थाेड्याफार लसी मिळाल्यास त्या परदेशात जाणारे विद्यार्थी, बाेटीवर जाणारे कर्मचारी, पालिका व पाेलीस कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, दिव्यांग तसेच दुसरा डोस बाकी असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहेत. त्यामुळे बहुतांश दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत.
कोविशिल्डचे सहा हजार ६०० लसी मंगळवारी पालिकेला मिळाल्या, मात्र दुसरा डोस शिल्लक असणाऱ्या नागरिकांची संख्या तब्बल २२ हजार आहे. त्यामुळे या नागरिकांना मुदतीत लस कशी काय द्यायची, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लसीकरण केंद्रांवर लुडबुड करणारे व वशिलेबाजी करणारे नगरसेवक, राजकारणी आता लस नसल्याने कुठे लपून बसलेत? असा सवाल नागरिक करत आहेत. खासगी रुग्णालयांमार्फत लसीकरण सुरू होते तेव्हा निदान १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना पैसे देऊन लस घेता येत होती. आता खासगी आणि सरकारी लस नसल्यामुळे कोरोनाचा मुकाबला करणार कसा? असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.