सर्व्हर गोंधळामुळे लसीकरणाला फटका, सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 06:14 AM2021-01-17T06:14:12+5:302021-01-17T06:14:20+5:30
लसीकरणाच्या मोहिमेला अत्यावश्यक सेवेतील लस घेण्यास पात्र कर्मचारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, मीडिया प्रतिनिधी यांनी गर्दी केल्याने काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
ठाणे - गेले दहा महिने कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत शनिवारी अखेरीस लसीकरण मोहीम सुरू झाल्याने यश लाभले. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील तीन हजार व्यक्तींना पहिल्या दिवशी लस दिली जाणार होती. मात्र, प्रत्यक्षात दिवसभरात एक हजार ८२६ व्यक्तींनाच लस दिली गेली. सर्व्हर डाऊन झाल्याने नोंदणी करणे अशक्य झाल्याने अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू होण्यास विलंब झाल्याने त्याचा फटका बसला. मात्र, त्यामुळे लसीकरणातील उत्साह कमी झाला नाही.
लस घेताना अनेकांनी अंगठा उंचावून किंवा बोटांनी ‘व्ही’ फॉर व्हिक्टरीचे चिन्ह करून बाजी मारल्याचे दाखवून दिले. लसीकरणाच्या मोहिमेला अत्यावश्यक सेवेतील लस घेण्यास पात्र कर्मचारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, मीडिया प्रतिनिधी यांनी गर्दी केल्याने काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
चार तासांचा विलंब, सर्व्हर डाउनमुळे वेळापत्रक कोलमडले -
अंबरनाथ / बदलापूर - अंबरनाथ व बदलापूरमध्ये कोविड लसीकरणाला पहिल्याच दिवशी ‘खो’ बसला. सकाळी नऊ वाजता सुरू होणारे लसीकरण वेगवेगळ्या अडचणींमुळे अखेर दुपारी दोन वाजता सुरू झाले. सकाळी साडेदहा वाजता लसीकरणास सुरुवात होताच नोंद करणारी वेबसाइट सुरू न झाल्याने गोंधळ झाला. सर्व्हर डाउन असल्याने लसीकरणाचे वेळापत्रक कोलमडले. अखेर दुपारी दोननंतर नोंदणी न करताच लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
अंबरनाथमध्ये १०० व बदलापुरात १०० अशा २०० लोकांना शनिवारी कोविडची लस देण्यात येणार होती. त्या अनुषंगाने २५ जणांचे चार गट तयार करून त्यांना ठरावीक वेळ देऊन बोलावले होते. मात्र, आधी वेळ बदलली व नंतर कोविड लसीकरणाची वेबसाईट सुरू न झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या वेबसाईटवर नोंदणी केल्याशिवाय लस न देण्याच्या सूचना असल्याने वेबसाईट सुरू होण्याची वाट डॉक्टर पाहत होते. अंबरनाथमध्ये ऑर्डनन्स रुग्णालयात, तर बदलापुरात दुबे रुग्णालयात लसीकरणाची सोय होती. वेबसाइट सुरू होत नसल्याने नंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातच नोंदणी करून लसीकरणाला प्रारंभ केला. मात्र, तोपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. अखेर पहिली लस डॉ. शुभांगी वाडेकर यांनी घेतली.
बदलापुरात लस घेतल्यानंतर एका व्यक्तीला चक्कर आली. मात्र, हा लसीचा परिणाम नसून त्याकरिता प्रतीक्षा करावी लागल्याने आलेल्या तणावाचा परिणाम आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तसेच त्याला वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
इतिहासाचे साक्षीदार होताना विसरले फिजिकल डिस्टन्सिंग -
ठाणे महापालिकेच्या चार केंद्रावर या लसीकरणास सुरुवात झाली. घोडबंदर भागातील रोझा गार्डनिया येथे महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर महिला डॉक्टरला पहिली लस देण्यात आली. या लसीचे स्वागत महापालिकेने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने केले. दुसऱ्या मजल्यापर्यंत जागोजागी रांगोळ्या काढल्या होत्या. तळ मजल्यावर रुग्णाची माहिती घेणे आणि दुसऱ्या मजल्यावर एका कक्षात लस दिली जात होती, तर दुसऱ्या कक्षात रुग्णावर अर्धा तास देखरेख ठेवली जात होती. परंतु, ऐतिहासिक लसीचे साक्षीदार होण्यासाठी येथे अनेकांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे लस देत असताना येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसले. आयुक्त नियम पाळा अशी ओरड करीत असतानाही येथील उपस्थितांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
ठाण्यातील चार केंद्रांवर शनिवारपासून लसीकरणाला सुरवात झाली. प्रत्येक लाभार्थ्याला मोबाइलवर मेसज करून मगच येण्याची विनंती केली जात होती. परंतु, शनिवारी पहिल्याच दिवशी या चारही केंद्रांच्या ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसले. या चारही केंद्रांवर पहिल्या दिवशी ३५३ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यानुसार सकाळी १०.५५ च्या सुमारास घोडबंदर भागातील रोझा गार्डनिया येथील केंद्रावर डॉ. वृषाली गौरवार यांना पहिली लस दिली जाणार होती. त्यामुळे या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी येथे अनेकांनी गर्दी केली होती.
मीडियाचे कर्मचारीदेखील या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर होते. वृषाली यांना लस देत असतांना त्यांच्या आजूबाजूला नुसता गराडा पडला होता.
त्याचबरोबर येथील स्टाफ तसेच सुरक्षारक्षक आणि स्थानिक नगरसेवकांसह त्यांच्या सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनीदेखील गर्दी केली होती. प्रत्येकाला आपण फोटोत यावे, असे वाटत होते.
आयुक्तांच्या सूचनेकडे दुर्लक्ष -
दुसरीकडे आयुक्त मात्र लांब उभे होते. त्यांच्याकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा म्हणून आवाज दिला जात होता. परंतु, तरीही कॅमेरे आणि इतर बघ्यांनी तेथे गर्दी केली होती. विशेष म्हणजे लस देत असताना आयुक्त, महापौर आणि इतर पदाधिकारी फोटोत यावेत म्हणूनही त्यांना कॅमेऱ्यावाल्यांनी गळ घातली आणि मग अधिकची गर्दी लस घेणाऱ्या डॉक्टर महिलेच्या आजूबाजूला झाल्याचे दिसून आले. अखेर इतिहासाचे साक्षीदार झाल्यानंतर येथील गर्दी कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून लस दिल्या गेल्या.