जिल्ह्यातील गावपाड्यात सव्वासात लाख जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:49 AM2021-09-08T04:49:04+5:302021-09-08T04:49:04+5:30
ठाणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांसह खासगी रुग्णालयांच्या २०६ लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत सात लाख २२ हजार ८४ नागरिकांचे कोरोना ...
ठाणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांसह खासगी रुग्णालयांच्या २०६ लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत सात लाख २२ हजार ८४ नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहेत. यामध्ये पाच लाख ४५ हजार ५८४ जणांनी पहिला डोस व एक लाख ७६ हजार ५०० जणांनी दुसरा डोस घेतला आहे. याशिवाय विशेष लसीकरणामध्ये २६० गरोदर महिला व स्तनदा मातांचेही लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मनीष के. रेंघे यांनी दिली.
ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात १७० शासकीय व ३६ खासगी रुग्णालयांत सध्या लसीकरणाचे काम सुरू आहे. या केंद्रांवर आतापर्यंत १६ हजार २४८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे. यांपैकी १२ हजार ३६२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. याशिवाय फ्रंटलाइन वर्कर्सपैकी ३० हजार ४६८ जणांनी पहिला आणि १० हजार ४४१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. या फ्रंटलाइन वर्कर्सपैकी तब्बल १० हजारांपेक्षा जास्त जणांनी अजून दुसरा डोस घेतलेला नसल्याचे निदर्शनात आले आहे.
जिल्ह्यातील ४५ ते ६० वर्षे वयोगटामधील एक लाख ४९ हजार २०५ जणांनी पहिला आणि ७४ हजार १९० जणांनी दुसरा डोस घेतला आहे. याशिवाय ६० वर्षांवरील ८८ हजार ४५१ ज्येष्ठांना पहिला डोस आणि ५३ हजार २६७ जणांनी दुसरा डोस घेतला. याप्रमाणेच १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील दोन लाख ६१ हजार २१२ जणांचा पहिला आणि १७ हजार २४० जणांनी त्यांचा दुसरा डोस घेऊन कोरोनापासून बचाव केला आहे.
--