एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांच्या एक लाख कामगारांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:47 AM2021-09-14T04:47:22+5:302021-09-14T04:47:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एमआयडीसी क्षेत्रात आता कोविडचे निर्बंध शिथिल केल्यानंतर बहुतांशी कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यातील सुमारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : एमआयडीसी क्षेत्रात आता कोविडचे निर्बंध शिथिल केल्यानंतर बहुतांशी कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यातील सुमारे एक लाख कामगारांचे लसीकरण करण्यात आले आहे. कंपनी व्यवस्थापनाने त्याबाबतची काळजी घेतल्याची माहिती कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली.
कामा संघटनेनेही दोन हजारांहून अधिक कामगारांचे लसीकरण करवून घेतले. अनेक ठिकाणी कामगारांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. संघटनेने कंपन्यांना यासंदर्भात आधीच माहिती देत कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कामगारांना त्यांच्या प्रकृतीबाबत काहीही तक्रार असल्यास थेट व्यवस्थापनाला कळवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. कंपन्यांत शारीरिक डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझेशन, स्वच्छता ठेवण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. सर्व स्थितीत कामगारांची सुरक्षितता जपण्याचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
तिसरी लाट येणार आहे का? असा सवाल अनेक कामगारांनी त्यांना केला. त्याबाबत सांगता येणार नाही. त्यामुळे लसीकरण वेगाने करून घेऊन स्वतः सुरक्षित राहावे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे तुलनेने कामगारांनी स्वतःहून लसीकरण करून घेण्याकडे ओढा असल्याचे दिसल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
---------