ऑनलाइन व ऑनलाइनप्रमाणे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:35 AM2021-05-03T04:35:05+5:302021-05-03T04:35:05+5:30
सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरात लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असला, तरी अनेकांच्या मनात लसीकरणाबाबत संभ्रम कायम ...
सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरात लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असला, तरी अनेकांच्या मनात लसीकरणाबाबत संभ्रम कायम आहे. ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतरही ऑफलाइन टोकन पद्धतीमुळे लसीकरणात अडसर येत असल्याचे चित्र आहे.
उल्हासनगर महापालिकेने आयआयटी कॉलेज व महापालिका शाळा क्र. २९ मध्ये लसीकरण केंद्र सुरू केले. सुरुवातीला लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद कमी मिळाला. मात्र, त्यानंतर लसीकरणाबाबत जनजागृती झाल्याने नागरिकांनी लसीकरण केंद्रावर पहाटे ५ वाजल्यापासून रांगा लावून टोकन पद्धतीनुसार लसीकरण करीत आहेत. ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचा निर्णय घेऊनही ऑफलाइनप्रमाणे लसीकरण सुरू आहे. नागरिकांचा प्रतिसाद बघता महापौर लीलाबाई अशान यांनी वेदान्त कॉलेज, बोट क्लब यांच्यासह प्रत्येक कॅम्पमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचे ठरवले आहे.
--------------------
महापालिका ॲपवर लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी केल्यावर डॉक्टरांनी दिलेल्या वेळेत जाऊन लस देण्यात येते. ही पद्धत चांगली आहे. मात्र, नागरिक पहाटे ५ पासून लसीकरण केंद्रासमोर रांगेत उभे राहून ऑफलाइननुसार टोकन पद्धतीने लसीकरण आजही सुरू आहे. ही पद्धत बंद होणे गरजेचे आहे. ऑनलाइननुसार नोंदणी केल्यास केंद्रावर गर्दी होणार नाही.
- रावसाहेब खरात, नागरिक
------------------
वरिष्ठ नागरिकांना लसीकरणाबाबत प्राधान्य देणे गरजेचे आहे. ऑनलाइन नोंदणीची अट त्यांच्यासाठी रद्द करावी. तसेच घरी एकटे राहणाऱ्या वरिष्ठ नागरिकांची यादी करून घरी जाऊन लस देणे योग्य आहे. सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करता येत नसल्याने त्यांच्यात नोंदणीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
- कारभारी गोडसे, ज्येष्ठ नागरिक
------------------------
शहरात जास्तीतजास्त लसीकरण होण्यासाठी महापालिकेने कॅम्पनुसार लसीकरण केंद्र सुरू करावे. तसेच केल्यास लसीकरणाला प्राधान्य दिल्यास केंद्रावर नागरिकांची गर्दी होणार नाही. केंद्रावर गर्दी झाल्यास सर्वात जास्त गैरसोय महिलांची होते. महिलांना लसीकरणाबाबत महापालिकेने प्रथम प्राधान्य द्यावे. लसीकरण केंद्रावर महिलांची संख्या लक्षणीय आहे.
शारदा अंभोरे, महिला
-----------------------
लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर पहिल्या दिवशी रात्री अंगदुखी व थोडा ताप आला. मात्र, आराम केल्यानंतर कमी होईल, असे वाटले. मात्र, लसीच्या पाचव्या दिवशी सर्दी होऊन ताप आल्याने, ॲण्टिजेन चाचणी केल्यावर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. मात्र, ऑक्सिजन लेव्हल कमी न झाल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार केले. आठ दिवसांत ठणठणीत झालो. लस घेतल्याने, कोरोना संसर्ग होऊनही इतर त्रास झाला नाही, असे एका रुग्णाने सांगितले.