कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगनंतर खाजगी रुग्णालयात लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 12:03 AM2021-03-02T00:03:02+5:302021-03-02T00:03:20+5:30

ठाणे महानगरपालिकेच्या १५ केंद्रांवर लसीकरण : आधारकार्ड दाखवून नोंदणी करणे अनिवार्य

Vaccination at a private hospital after staff training | कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगनंतर खाजगी रुग्णालयात लस

कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगनंतर खाजगी रुग्णालयात लस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे  : फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस दिल्यानंतर सोमवारपासून सामान्यांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. शहरात असलेल्या १५ केंद्रावर दीड हजार लसींचे लक्ष्य ठेवले आहे. परंतु, शहरात सोमवारी एकाही खाजगी रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू झाली नसल्याची माहिती महापालिकेने दिली. आता नोंदणीसाठी परवानगी मागितली जात असून संबंधित केंद्रावर नोंदणी केल्यानंतर रुग्णालयांना त्यानुसार कोरोना लसीचा पुरवठा केला जाणार असून त्यासाठी खासगी कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंगही सुरू केले असल्याची माहिती महापालिकेने दिली. 


ठाण्यात   महापालिकेच्या माध्यमातून १५ कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहेत. आतापर्यंत या केंद्रावर फ्रंटलाईन वर्कर्सला लसीकरण केले आहे. परंतु, आता केंद्राने १ मार्च पासून ४५ वयापुढील नागरिकांसाठी परंतु, ज्यांना व्याधी असतील असे आणि ६० च्या पुढील वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. यासाठी ६० वर्षांपुढील नागरिकांनी केंद्राच्या ठिकाणी येऊन आधार कार्ड दाखवून नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांना तत्काळ लसीकरण करण्यात येत आहे. शासकीय केंद्राच्या ठिकाणी हे लसीकरण मोफत असणार आहे. तर खाजगी रुग्णालयांच्या ठिकाणी यासाठी २५० रुपये मोजावे लागणार आहेत.

४६ शासकीय केंद्रांवर लसीकरण 
जिल्ह्यातील १३ शासकीय रुग्णालये, ३३ प्राथमिक केंद्र, महापालिका, नगरपालिका हॉस्पिटल, इएसआयसीएस रुग्णालये आदींच्या ठिकाणी लसीकरण सुरू केले आहे. परंतु, ज्यांना मोफत हवी असेल त्यांनी शासकीय रुग्णालयात यावे आणि ज्यांना २५० रुपये भरून लस घ्यायची असेल त्यांनी खाजगी रुग्णालयात जावे. त्यानुसार याची सुरुवात झालेली आहे. यासाठी खाजगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग सुरू केले आहे. लस दिल्यानंतर रुग्णाला काही साईड इफेक्ट झाले तर काय करता येईल, या दृष्टिकोनातूनदेखील खाजगी रुग्णालयांना माहिती दिली जात आहे. त्यानुसार खाजगी रुग्णालयांच्या ठिकाणी २ ते ४ दिवसांत लसीकरण सुरू करण्यात येणार आहे, तसेच रुग्णांचा लोड वाढला तर केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे. कोविन ॲपमध्ये बदल केलेले आहेत. त्यानुसार त्यामध्ये, आरोग्य सेतू किंवा केंद्रावर जाऊन सुद्धा नोंदणी करता येणार आहे. 
- कैलास पवार, 
जिल्हा शल्यचिकित्सक, 
ठाणे जिल्हा रुग्णालय

खासगी रुग्णालयांना गरजेनुसारच लसींचा पुरवठा
ज्या खाजगी रुग्णालयांच्या ठिकाणी महात्मा फुले, राजीव गांधी किंवा इतर कोणतीही शासकीय योजना सुरू असतील, त्या रुग्णालयांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु, त्या रुग्णालयांनी त्यासाठी जिल्ह्याच्या मुख्य केंद्राच्या ठिकाणी नोंदणी करणे गरजेचे आहे. त्याठिकाणी नोंदणी केल्यानंतर त्याची पावती घेऊन ती महापालिकेच्या केंद्रावर सादर करायची आहे. त्यानंतरच खाजगी रुग्णालयांना गरजेनुसार 
डोस उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती उपायुक्त संदीप 
माळवी यांनी ‘लोकमत’ला दिली. 


ज्येष्ठांकडून कमी प्रतिसाद
शासकीय केंद्राच्या ठिकाणी ही मोहीम सुरू झाली असली तरी त्याला ज्येष्ठांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचेच दिसत आहे. पहिल्या दिवशी अतिशय तुटपुंज्या नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केल्याचे केंद्राच्या ठिकाणी दिसत होते. तर काही केंद्रावर फ्रंटलाईन वर्कर्सना दुसरा डोस दिला जात असल्याने त्यांची गर्दी काही प्रमाणात दिसत आहे. 
लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांना अटी
खासगी रुग्णालय हे ५० बेडचे असावे, त्याठिकाणी तीन रूम असावेत, एका ठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी, लसीकरणासाठी आणि तिसरा आराम करण्यासाठी शिवाय कोल्ड रूमचीही व्यवस्था असावी, असे काही नियम ठरविलेले आहेत. त्यानुसार डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी ठाण्यात एकाही खाजगी केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झालेली नाही. परंतु, शासकीय केंद्राच्या ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाल्याचे दिसून आले. 
 

Web Title: Vaccination at a private hospital after staff training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.