खासगी रुग्णालयातील लसीकरण जोमात; मात्र शासकीय रुग्णालयात कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:17+5:302021-07-23T04:24:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एकीकडे ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात शासकीय लसीकरण अर्थात मोफत लसीकरण मोहिमेला मागील तीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकीकडे ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात शासकीय लसीकरण अर्थात मोफत लसीकरण मोहिमेला मागील तीन दिवसांपासून खोडा लागला आहे. किंबहुना शासकीय केंद्रावर तीन दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद आहे. परंतु, खासगी रुग्णालयाच्या ठिकाणी लसीकरण मात्र सुरू आहे. शासकीय यंत्रणांनी लस नसल्याचे आणि पावसाचे कारण दिले असले तरीदेखील खासगी रुग्णालयात मात्र लसीकरण सुरू आहे. त्यामुळेच खासगी रुग्णालयात सुकाळ आणि सरकारीमध्ये लसींचा दुष्काळ अशीच म्हणण्याची वेळ आता आली आहे.
मागील काही दिवसांपासून ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, मीरा-भाईदर आदींसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लसीकरण मोहीम थांबली आहे. मागील तीन दिवसांपासून शासकीय केंद्रावर लस देण्यात आलेली नाही. केवळ पाऊस जास्तीचा असल्याने प्रत्येक महापालिकेने लसीकरण बंद ठेवल्याचेही सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात मागील तीन दिवसांपासून ठाण्यासह इतर कोणत्याही महापालिकांना लसींचा साठाच उपलब्ध झाला नसल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. त्यामुळेही लसीकरण बंद आहे. एकीकडे शासकीय केंद्रावर आठवड्यातून एक ते तीन दिवस लसीकरण सुरू असताना खासगी रुग्णालयांत मात्र जोरात लसीकरण मोहीम सुरू आहे. खासगी रुग्णालयांतील रोजच्या रोज स्लॉट बुक होत असून नागरिक रांगा लावून तेथे त्यातही पैसे देऊन नाइलजास्तव लस घेत असल्याचे दिसत आहे. शासकीय यंत्रणांच्या ठिकाणी वारंवार लसींचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे मोफत लस केव्हा मिळणार असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने आणि लसींचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना रेल्वेतून प्रवासाची मुभा मिळणार असल्याने शासकीय लसीची वाट न बघता आणि खिशाला कात्री लावून खासगी केंद्रातून जाऊन लस घेत आहेत.
ठाण्यासह जिल्ह्याच्या इतर महापालिकांच्या ठिकाणी हीच परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे कोणी लस देता का लस अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. परंतु, खासगी रुग्णालयांना लस मिळत असताना शासकीय यंत्रणेला लस का मिळत नाहीत, असा सवालही सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत.
आतापर्यंत झालेले लसीकरण - २२,७८,०३५
पहिला डोस - १६,८०,७८४
दुसरा डोस - ५,९७,२५१
ठाणे जिल्ह्यात लाभार्थींची संख्या साधारणपणे ९९ लाख ४२ हजार ४०७ एवढी असून त्यातील केवळ २२ लाख ७८ हजार ३५ जणांचे लसीकरण झालेले आहे. त्यानुसार अजून ७६ लाख ६४ हजार ३७२ जणांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर एकही डोस न घेतलेले १८ ते ४४ वयोगटात ४१ लाख ७५ हजार ८११ लाभार्थी असून त्यातील ३ लाख ७१ हजार ८८१ जणांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यानुसार ३८ लाख ३ हजार ९३० जणांना अद्यापही लसच मिळालेली नाही. तर ४६ ते ५९ वयोगटातील १४ लाख १४ हजार ७८४ लसीकरण शिल्लक आहे.
शासकीय लसीकरण केंद्रात शून्य लस
मागील तीन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही लसींचा साठाच न आल्याने लसीकरण थांबले आहे. परंतु, पावसाचे कारण सांगून लसीकरण बंद ठेवण्यात येत असल्याचे महापालिकांचे म्हणणे आहे. परंतु, याच दिवसात खासगी केंद्रावर मात्र लसीकरण सुरू आहे. खासगी केंद्रावर कुठे रोजच्या रोज १०० तर कुठे ५० डोस दिले जात आहेत.
हेच का मोफत लसीकरण?
मागील जानेवारीपासून लस घेण्याची वाट बघत आहे. परंतु, अद्यापही लस घेता आलेली नाही. त्यात मागील काही दिवसांपासून शासकीय केंद्रावर लस मिळत नसताना खासगी रुग्णालयांत मात्र लस मिळत आहेत. त्यामुळे आता हेच का मोफत लसीकरण, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
(प्रशांत बनसोडे - नागरिक)
लस घ्यायची आहे, मात्र शासकीय केंद्रावरील रांगा पाहता आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतरही तासनतास रांगेत उभे राहाण्याची भीती मनात आहे. त्यामुळे लस घ्यायची कशी, असा प्रश्न आम्हाला सतावत आहे. त्यात आता एक ते दोन दिवसच शासकीय केंद्रावर लसीकरण सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी अधिक होत आहे. यामुळेच सध्या तरी लस घेतलेली नाही.
(रोहित क्षीरसागर - तरुण)
मागील तीन दिवसांपासून लसींचा स्टॉक आलेला नाही. त्यामुळे आणि पाऊस जास्तीचा पडत असल्याने लसीकरण बंद ठेवले. लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
(संजय हेरवाडे - अतिरिक्त आयुक्त, ठामपा)