ठाण्यात लसीकरणाचा स्लॉट राजकारण्यांकडून होताेय हॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:41 AM2021-05-09T04:41:45+5:302021-05-09T04:41:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : लसीकरण स्लॉट बुक करण्यासाठी सध्या कोविन आणि आरोग्य सेतू ॲपवर अनेकांची झुंबड उडत आहे; ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लसीकरण स्लॉट बुक करण्यासाठी सध्या कोविन आणि आरोग्य सेतू ॲपवर अनेकांची झुंबड उडत आहे; परंतु लसीकरणासाचा स्लॉट बुक करण्याची वेळ आली तर काही सेंकदातच त्या दिवसाचा संपूर्ण स्लॉटचा बुक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची निराशा होत आहे. मात्र, दुसरीकडे ठाण्यात काही राजकीय मंडळींची माणसे कार्यालयात बसून एकागठ्ठा अशा प्रकारचे स्लॉट बुक करून आपल्या मतांचा जोगवा गोळा करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात हे स्लॉट ओपन होण्यापूर्वी काही मिनिटे आधीच एका पेजवरून संबंधितांना मेसेज जात असल्याने ते तात्काळ बुक होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या पदरी निराशा पडत आहे.
ट्रेनची बुकिंग करताना किंवा तात्काळ बुकिंग करताना नागरिकांना ज्या समस्येला सामोरे जावे लागत होते. अगदी त्याच पद्धतीने आता लसीकरणाचा स्लॉट बुक करताना अशाच प्रकारच्या समस्येला जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ठाण्यात लसींचा तुटवडा असला तरी काही केंद्रावर रोजच्या रोज लसीकरण सुरू आहे; परंतु लसीकरणाचा स्लॉट बुक करताना नागरिकांना एकतर बुकिंगच्या वेळेस अपेक्षित असलेला ओटीपी वेळेत मिळत नाही किंवा मिळालाच तर अगदी काही सेकंदांत ९०० लोकांचा स्लॉटदेखील बुक झालेला असतो. त्यामुळे काही जण तर स्लॉट बुकिंग करण्यासाठी दिवसभर मोबाइलवर असतात. आता स्लॉट पडेल नंतर स्लॉट पडेल या आशेवर असतात; परंतु या त्यांच्या आशा फोल ठरत आहेत. कारण ते ज्या वेळेस बुकिंग करायला जात आहेत, त्याच वेळेस हॅकिंगमुळे बुकिंग फुल असल्याचे दाखविले जात आहे.
ठाण्यात काही राजकीय मंडळींच्या कार्यालयात काम करणाऱ्या मुलांना सध्या स्लॉट बुकिंगची जबाबदारी देण्यात आली आहे. ही मंडळी आपल्या परिसरातील नागरिकांचे आधार कार्ड घेऊन, त्याद्वारे आपल्या मोबाइलद्वारे ॲपवर रजिस्ट्रेशन करून घेत आहेत. एक व्यक्ती या ॲपवर चार जणांचे रजिस्ट्रेशन करून एकाच वेळेस चार जणांचा स्लॉट बुक करू शकतो. अशाच पद्धतीने एका एका राजकीय नेत्याकडे ८ ते १० किंवा २० जणांची टीम कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्यांच्या माध्यमातून बुकिंगचा स्लॉट अगदी काही क्षणात बुक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जे प्रामाणिकपणे बुकिंगसाठी प्रयत्न करीत आहेत, त्यांची मात्र निराशा होत आहे.
ठाण्यातील काही ॲप विकसित करणाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रेल्वे बुकिंग प्रमाणोच या ॲपमध्येदेखील स्थानिक पातळीवर छेडखानी करण्यात आली असून स्लॉट बुकिंगसाठी आणखी एक ॲप विकसित केला असावा, असा दावा करण्यात आला आहे. त्यातही काही मंडळींकडे ठाण्यासाठी इन्स्टाग्रामची एक लिंकही गेली आहे, ज्या लिंकद्वारे स्लॉट बुकिंगच्या २ ते ३ मिनिटे आधी स्लॉट बुकिंग सुरू होणार याचा मेसेज जात आहे. त्यानुसार तत्काळ ही मंडळी ॲक्टिव्ह होत असून त्यामाध्यमातून ते ग्रुप बुकिंग करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच वेळेस दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या मोबाइलवर याच वेळेस ओटीपी मिळविण्यासाठी भानगड सुरू असते, याचाच अर्थ जर सर्वसामान्यांना ओटीपी जात नाही, तर तो ओटीपी जातो कोणाला, असा सवालही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
.......
एका क्षणात ९०० जणांचा स्लॉट बुक होतो कसा, असा प्रश्न आहे. आपल्याकडील इंटरनेट स्पीड जास्तीचा असला तरी स्लॉट बुकिंगसाठी ३० ते ४० सेकंदांचा कालावधी जातो; परंतु त्याच वेळेस स्लॉट बुक होताना दिसत आहे. यामध्ये आणखी एक स्पॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असल्याचे दिसत असून त्या माध्यमातून ठराविक मंडळींकडे त्याची लिंक दिली असल्याची दाट शक्यता आहे. त्याच माध्यमातून सर्वसामान्यांना स्लॉट उपलब्ध होत नाही. त्यामुळे यामध्ये नक्कीच यात एकतर स्पॉफ्टवेअर विकसित करणारी टीम कार्यरत असून हॅकरदेखील कार्यरत असू शकत आहेत.
(गोपाल साबे - ॲप, विषयक अभ्यासक)
....
भारतातील एवढे लोक अद्यापही टेक्नोसेव्ही नाहीत की काही सेकंदांत स्लॉट बुक होऊ शकतात. त्यामुळे यात नक्कीच यावर कोणाचा तरी कंट्रोल आहे, केंद्राचे ॲप असले तरीदेखील खालच्या पातळीवर वेगळे ॲप विकसित करून त्या माध्यमातून स्पॉटवेअर विकसित करणाऱ्या मंडळीकडून हे स्लॉट बुक केले जात आहेत. त्यातूनच हे प्रकार घडत असावेत, असे स्पष्ट दिसत आहे. त्यातही कोणताही ॲप कंट्रोल करता येऊ शकतो, त्याच माध्यमातून हे घडले असावे, असे दिसत आहे.
(अमित मेढेकर - ॲपविषयक अभ्यासक)