ठाणे जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी ११ नोव्हेंबर पासून लसीकरण विशेष सप्ताह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 06:01 PM2021-11-01T18:01:23+5:302021-11-01T18:01:56+5:30

रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी लसीकरणावर भर देणे आवश्यक-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

vaccination special week from November 11 to speed up vaccination in Thane district | ठाणे जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी ११ नोव्हेंबर पासून लसीकरण विशेष सप्ताह

ठाणे जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी ११ नोव्हेंबर पासून लसीकरण विशेष सप्ताह

googlenewsNext

ठाणे: कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी जिल्ह्यात लसीकरणावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. दिवाळी तसेच पीक कापणीच्या कामामुळे लसीकरणाला ग्रामीण भागात प्रतिसाद कमी असल्याने याभागात लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे. त्यासाठी दिवाळी नंतरच्या पुढील आठवड्यात दि.११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यामध्ये लसीकरण विशेष सप्ताह राबविण्याचे निर्देश जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे दिले. 

लसीकरणासंदर्भातील जिल्हा टास्क फोर्सची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती वंदना भांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, जिल्हा शल्सचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक गावडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.अंजली चौधरी आदि उपस्थित होते. 

ग्रामीण भागामध्ये सण-उत्सव त्याच बरोबर शेतीकामांमुळे लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सध्या ग्रामीण दुर्गम भागातील गावांमध्ये लसीकरणासाठी विशेष वाहने देखील जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली असून सुमारे १११ गावांमध्येही वाहने जातील असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सादरकीरणादरम्यान सांगितले. जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी श्री.नार्वेकर म्हणाले, लसीकरण मोहिम कालबध्द पध्दतीने राबविण्यात येत असून त्यासाठी तालुका टास्क फोर्सला अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. सध्या ग्रामीण भागातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज असून, दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रित असली तरी लसीकरण करुन संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी त्याने मदत मिळेल, त्यामुळे दिवाळी आणि कापणीचा हंगाम संपुष्टात आल्यानंतर पुढील आठवड्यापासून लसीकरणाला वेग देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यासाठी दिवाळी नंतर मिशन मोडवर दि. ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत लसीकरण विशेष सप्ताह राबविण्याचे नार्वेकर यांनी सांगितले. डिसेंबर पर्यंत लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
                
ज्या गावांमध्ये लसीकरणाचे सत्र आयोजित केले जाईल, तेथील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य त्याच बरोबर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी यांना पूर्वसूचना देतानाच त्यांच्या माध्यमातून लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, यासाठी तालुका तसेच गाव पातळीवरील अन्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवावा असे नार्वेकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील एकूण विद्यार्थीसंख्या त्यापैकी लसीकरण झालेल्यांचीसंख्या या संदर्भातील माहितीचे संकलन उच्च  व तंत्रशिक्षण विभागा मार्फत करण्यात यावे. त्याचबरोबर ग्रामपंचायत निहाय किती लोकांचे लसीकरण झाले याबाबत माहिती संकलित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

मुरबाड तालुक्यातील काही गावांमध्ये १०० टक्के लसीकरण झाल्याचे आढळून आले असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अन्य गावांनी देखील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे नार्वेकर यांनी सांगितले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी, महापालिका, नगरपालिका यांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: vaccination special week from November 11 to speed up vaccination in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.