ठाण्यात लसीकरण पुन्हा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:35+5:302021-07-07T04:49:35+5:30
ठाणे : गेले काही दिवस सुरळीत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला पुन्हा एकदा खो बसला आहे. लसींचा तुटवडा असल्याने, ...
ठाणे : गेले काही दिवस सुरळीत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला पुन्हा एकदा खो बसला आहे. लसींचा तुटवडा असल्याने, सोमवारी लसीकरण मोहीम जवळजवळ ठप्प होती. केवळ पोस्ट कोविड आणि कौसा स्टेडिअम येथेच लसीकरण सुरू होते. परंतु, तेथेही केवळ परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच लसीकरण सुरू होते. तर शहरातील इतर सर्वच ठिकाणचे लसीकरण बंद होते.
मागील आठवड्यातदेखील सलग दोन दिवस लसीकरण बंद होते. त्यानंतर शनिवारी लसीकरणास सुरुवात होताच, सर्वच केंद्रावर नागरिकांची लस घेण्यासाठी झुंबड उडाली होती. आतादेखील असाच काहीसा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाणे जिल्ह्यात पाच लाख ३३ हजार १३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पाच लाख १७ हजार ४९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये १० हजार ७५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ठाण्यात आतापर्यंत ५ लाख ८७ हजार ९३४ जणांना लस देण्यात आली आहे. ठाण्याची लोकसंख्या सुमारे २५ लाखांच्या आसपास आहे. परंतु, आतापर्यंत २७ टक्केच लसीकरण झाले आहे. मागील काही दिवस लस उपलब्ध होत होत्या. परंतु त्या आपल्यालाच मिळाव्यात यासाठी राजकीय मंडळींमध्ये स्पर्धा लागली होती. सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांनाच लस उपलब्ध होत असल्याने भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांनादेखील निवेदन दिले होते. राजकीय स्पर्धा सुरू असतानाच मागील आठवड्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे सलग दोन ते तीन दिवस शहरातील लसीकरण बंद होते. त्यानंतर शनिवारी लसीकरणाला सुरुवात होताच, सर्वच लसीकरण केंद्रावर पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यातूनच काही केंद्रावर राडा झाल्याचे दिसून आले. आता पुन्हा लसींचा तुटवडा निर्माण झाला असून ठाण्यातील लसीकरण मोहिमेला पुन्हा एकदा खो बसला आहे.