कल्याण-डोंबिवलीत खाजगी रुग्णालयांतील तीन केंद्रांवर लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:39 AM2021-04-10T04:39:23+5:302021-04-10T04:39:23+5:30
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेकडे एक दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा असल्याने खाजगी रुग्णालयांतील तीन लसीकरण केंद्रांवरील लसीकरण शुक्रवारपासून ...
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेकडे एक दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा असल्याने खाजगी रुग्णालयांतील तीन लसीकरण केंद्रांवरील लसीकरण शुक्रवारपासून बंद करण्यात आले. या केंद्रांवर लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या पदरी निराशा आली.
महापालिकेची सात लसीकरण केंद्रे आहेत. याव्यतिरिक्त १३ खाजगी रुग्णालयांत लसीकरणाची केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लसीकरणाची केंद्रे वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. लोकप्रतिनिधींकडून केली जाणारी मागणी लक्षात घेता प्रशासनाने लसीकरणाला वेग देण्यासाठी सरकारी आणि खाजगी इस्पितळात लसीकरण सुरू केले. महापालिकेकडे तीन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा होता. कालच्या तारखेत ९ हजार लसींचे डोस महापालिकेकडे शिल्लक होते. शुक्रवारी केवळ चार हजार लसींचे डोस शिल्लक आहेत. महापालिकेने लस देताना महापालिकेच्या लसीकरण केंद्रांना प्रथम प्राधान्य दिले. महापालिकेकडे उपलब्ध असलेले लसींचे डोस पाहता महापालिकेस खाजगी रुग्णालयांना लसींचे डोस उपलब्ध करून देता आले नाही. त्यामुळे शुक्रवारी एम्स, ममता, सिद्धिविनायक रुग्णालयातील लसीकरण बंद पडले. या रुग्णालयांत लसीकरणासाठी गेलेल्या नागरिकांच्या पदरी निराशा आली आहे. काही ज्येष्ठ नागरिक भर उन्हात रुग्णालयात लसीकरणाकरिता गेले होते. मात्र त्या ठिकाणी लस नसल्याने घामाघूम होत लस न घेताच रिकाम्या हाती त्यांना परत फिरावे लागले. महापालिका प्रशासनाने दोन लाख लसींचे डोस मागितले आहेत. मात्र या मागणीची पूतर्ता आजमितीस झालेली नव्हती. महापालिका आयुक्तांच्या मते तीन दिवस पुरेल इतका लसींचा साठा महापालिकेकडे उपलब्ध आहे. मात्र लसीकरणाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी आजच्यापुरताच लसींचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. लसीचे डोस वेळेत उपलब्ध झाले नाही, तर लसीकरण ठप्प होऊ शकते.
गर्दी टाळण्यासाठी टोकन सिस्टीम
लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी मोठागाव येथील सागर सृष्टी इमारतीत सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर इलेक्ट्रॉनिक्स टोकन देण्याची शक्कल शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी लढविली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्यांनी प्रथम टोकन घ्यायचे. त्यानंतर नाव नोंदणी करायची. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, आरोग्य सेवेत फ्रंटलाइन वर्कर्स असल्याचे ओळखपत्र सादर केल्यास लसीकरणाची प्रक्रिया सुलभ होऊ शकते, असे आवाहन म्हात्रे यांनी केले आहे.
------------------
वाचली.