मीरा-भाईंदरमध्ये पहाटेपर्यंत लसीकरण, नागरिकांची गर्दी आणि कर्मचाऱ्यांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:49 AM2021-09-10T04:49:08+5:302021-09-10T04:49:08+5:30
मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिकेने बुधवारी सकाळपासून सुरु केलेले जम्बो ऑफलाईन लसीकरण गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होते. सुमारे १६ ...
मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिकेने बुधवारी सकाळपासून सुरु केलेले जम्बो ऑफलाईन लसीकरण गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होते. सुमारे १६ ते १८ तास चाललेल्या लसीकरणात पालिकेने तब्बल ३२ हजार १५५ नागरिकांना लस दिली. या लसीकरणातही राजकारणी मंडळींचा हस्तक्षेप झाला होता, त्यामुळे लस घेण्यासाठी झालेल्या गर्दीत लोकांचे प्रचंड हाल झाले तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला. सोशल डिस्टन्सिंगला तर या गर्दीत हरताळच फासला गेला.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेने गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ४५ व त्या पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण आयोजित केले होते. त्यानंतर दुपारी २ ते ३ वाजल्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले. भाईंदर पूर्वेस नवघरच्या केंद्रावर पहाटे ४ वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. काही ठिकाणी मध्यरात्रीनंतर दिड तर कुठे ३ वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. महापालिकेने त्यासाठी ३७ लसीकरण केंद्र ठेवली होती. १८ ते ४४ वयोगटातील २० हजार ९२३ नागरिकांना तर ४५ व त्यापुढील वयोगटातील ११ हजार २३२ लोकांना लस दिली गेली.
गुरुवारी पहाटेपर्यंत चालवलेल्या या जम्बो ऑफलाइन लसीकरण मोहिमेमुळे लस घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरा व पहाटेपर्यंत थांबलेल्या लोकांचे हाल झाले. तासऩतास लोक रांगेत व गर्दीत लस मिळण्यासाठी ताटकळत होते. त्यांच्यात आपसातच वादविवाद व खटकेही उडताना दिसत होते. तर लसीकरण केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील मोठा ताण पडला. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांचे हाल झाले. अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या घरी जाता आले नाही. काहींनी पालिकेच्या इमारतींत मिळेल त्या ठिकाणी अंग टाकले. याशिवाय नगरसेवक व राजकारण्यांचा हस्तक्षेप सुरूच होता, त्यामुळे गैरसोय झाल्याचा आरोप नागरिकांनी केला.