छाया रुग्णालयात पुन्हा टोकन पद्धतीने लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:44 AM2021-08-24T04:44:44+5:302021-08-24T04:44:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील छाया रुग्णालयात राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे सर्वसामान्य नागरिकांना लस मिळण्यात अडचणी येत असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील छाया रुग्णालयात राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे सर्वसामान्य नागरिकांना लस मिळण्यात अडचणी येत असल्याने नागरिकांनी विरोध केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या ठिकाणची टोकन सिस्टम बंद करून सर्व लसीकरण ऑनलाइन पद्धतीने करण्याचे ठरवले होते; परंतु ऑनलाइन पद्धतीमुळे अंबरनाथच्या बहुतांश नागरिकांना लस मिळत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्ताची दखल घेत सोमवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनासोबत चर्चा करून पुन्हा टोकन सिस्टम सुरू करण्यास रुग्णालय प्रशासनाला भाग पाडले.
अंबरनाथचे बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. रुग्णालयातील डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना न जुमानता काही राजकीय पुढारी आणि त्यांचे हस्तक लसीकरण मोहिमेत व्यत्यय निर्माण करीत होते. काही बड्या राजकीय पुढाऱ्यांचे नाव पुढे करून प्रभागातील नागरिकांना लस देण्यासाठी आणले जात होते. राजकीय पुढाऱ्यांच्या वशिलेबाजीमुळे सर्वसामान्य नागरिकांना लस उपलब्ध होत नव्हती. सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन छाया रुग्णालय प्रशासनाने टोकन सिस्टम बंद करून सर्व लसीकरण ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांसाठी खुले केले. मात्र, ऑनलाइनमुळे बहुसंख्य अंबरनाथकरांना लस उपलब्ध होत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल घेत सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक उमेश पाटील यांनी रुग्णालय प्रशासनासोबत चर्चा केली व ऑफलाइन अर्थात टोकन पद्धतीने लसीकरण सुरू करण्याची मागणी केली. राजकीय हस्तक्षेप कमी झाल्यास टोकन सिस्टम सुरू करण्याचे रुग्णालय प्रशासनाने मान्य केले. राजकीय पुढाऱ्यांनी लसीकरणास मदत करावी, अशी माफक अपेक्षा रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली.
----------फोटो आहे
...........