अत्यावश्यक सेवेतील ६.६० लाख कर्मचाऱ्यांना लस, दोन वेळा दिला जाणार कोरोना लसीचा डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 12:38 AM2020-12-26T00:38:57+5:302020-12-26T00:41:25+5:30
coronavirus news : कोरोनाच्या नवीन विषाणूने धडक दिली असली, तरी कोणत्याही क्षणी संपूर्ण देशात ‘को-वीन’ मोहिमेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
ठाणे : कोरोनाची लस आता वर्षात येणार असल्याने त्याचे नियोजन करण्यासाठी महापलिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार आरोग्य सेवेतील अत्यावश्यक सेवेतील ठाण्यातील सुमारे ६ लाख ६० हजार लाभार्थ्यांची यादी पालिका प्रशासनाने तयार केली असून १३२ दिवसांमध्ये लसीकरणाचे दोन्ही टप्पे पार करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. लसींचा साठा वेळेत उपलब्ध झाल्यास चार महिन्यांत १३ लाख २० हजार नागरिकांच्या लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण होईल, असा विश्वास पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या नवीन विषाणूने धडक दिली असली, तरी कोणत्याही क्षणी संपूर्ण देशात ‘को-वीन’ मोहिमेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या मोहिमेंतर्गत सुरुवातीला एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लाभार्थ्यांचे दोनवेळा लसीकरण केले जाणार आहे. त्यानुसार देशात ३३ कोटी, महाराष्ट्रात ५१ लाख तर ठाणे पालिका हद्दीत ६ लाख ६० हजार लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची योजना आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे पालिकेने त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. लसीकरणासाठी मुबलक जागा असलेल्या २० आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली असून त्यासाठी १०० जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक पथक दिवसाला ५०० लस देणार आहे. म्हणजे ठाण्यात रोज १० हजार आणि आठवड्याला ७० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.
सर्वप्रथम आरोग्य सेवकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्यासाठी ६ लाख ६० हजार लाभार्थ्यांची यादी तयार आहे. लसींचा मुबलक साठा आल्यास १ लाख ८० हजार फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यात येईल. फ्रंटलाइनमध्ये आयुक्तांपासून ते शासकीय, पालिका अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष फिल्डवर असलेल्यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.
६ लाख ६० हजार लाभार्थ्यांचे दोन वेळा लसीकरण होणार आहे. म्हणजे १३ लाख २० हजार लसीकरणाचे मोठे आव्हान आहे. त्यातही एकाही लाभार्थ्याचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण चुकता कामा नये याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.