ठाणे शहरात ५४ ठिकाणी होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:36 AM2021-04-05T04:36:14+5:302021-04-05T04:36:14+5:30
ठाणे : गेल्या दीड महिन्यापासून ठाणे शहरातील विविध भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. याची गांभीर्याने दखल घेत ...
ठाणे : गेल्या दीड महिन्यापासून ठाणे शहरातील विविध भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. याची गांभीर्याने दखल घेत ठाणे महापालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार आता सोमवारपासून शहरात ५४ ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये खासगी आणि शासकीय अशा २४ ठिकाणी, तर ३० शासकीय केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. असे असताना दुसरीकडे या आजारावरील लसीकरण मोहीमही व्यापक प्रमाणावर राबविली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसह खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात असल्याची माहिती पालिकेने दिली. त्यात पुढील आठवड्यामध्ये पालिका क्षेत्रात ५४ केंद्रांच्या माध्यामतून लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये १२ खासगी आणि १२ शासकीय अशा २४ ठिकाणी दररोज लसीकरण करण्याचे नियोजन आहे. दुसरीकडे ३० शासकीय रुग्णालयांमध्ये आठवड्यातून तीन ते चार दिवस लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, जास्तीत जास्त लाभार्थींनी लसीकरण करण्याचे नियोजन चोख करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त शर्मा यांनी केले आहे.