जिल्ह्यात आजही अनेक शहरांत लसीकरणाचे वाजणार तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 11:27 PM2021-04-28T23:27:21+5:302021-04-28T23:27:30+5:30
अवघ्या ४० हजार ७०० लसी शिल्लक : ठाण्यातील लसीकरण बंद
ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा पुन्हा एकदा अपुरा पडू लागला आहे. काही ठिकाणांची केंद्रे बंद केली आहेत; तर काही ठिकाणी केंद्रांची संख्या कमी केली आहे. ठाण्यात बुधवारी ५६ पैकी अवघी २६ केंद्रे सुरू होती. तर गुरुवारी ते बंद राहणार आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील केंद्रदेखील बंद होते. ठाणे महापालिकेसह इतर महापालिकांच्या ठिकाणी तुरळक साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्यात कोविशिल्डचा अवघा २६ हजार ९२०; तर कोव्हॅक्सिनचा १३ हजार ७८० लसींचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे संबंधित महापालिका, नगरपालिकांसह जिल्हा आरोग्ययंत्रणेला गुरुवारी अनेक केंद्र बंद ठेवावी लागणार असून लसीकरणाचे तीनतेरा वाजणार आहेत.
ठाण्यासह इतर जिल्ह्यांतील इतर महापालिकांनीदेखील लसींचा साठा मिळावा यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.
अद्यापही तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. सध्या भिवंडीकडे कोव्हॅक्सिनचे ४५०, तर कोविशिल्डचे एक हजार ७०० डोस, ठाणे महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे अवघे ११० आणि कोविशिल्डचे तीन हजार ८०० डोस शिल्लक आहेत.
कल्याण-डोंबिवलीत कोव्हॅक्सिनचे एक हजार २९० डोस असून कोविशिल्डचे एक हजार ८४० डोस, मीरा-भाईंदरमध्ये कोव्हॅक्सिनचे तीन हजार १२०, कोविशिल्डचे पाच हजार, नवी मुंबईतही कोव्हॅक्सिनचे चार हजार ४७० व कोविशिल्डचे तीन हजार ३६० डोस शिल्लक आहेत; तर उल्हासनगरमध्ये कोव्हॅक्सिनचे ८००, कोविशिल्डचे दोन हजार ७३० डोस शिल्लक आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोव्हॅक्सिनचे तीन हजार ५४० आणि कोविशिल्डचे आठ हजार ४९० डोस शिल्लक असल्याची माहिती समोर आली. त्यातही याच शिल्लक डोसमधून बुधवारी लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आज, गुरुवारी लसींचा साठा मिळाला नाही तर अनेक ठिकाणची लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ स्थानिक प्रशासनासमोर येणार आहे.