गृहसंकुलांत लसीकरण होणार सुरू, ज्येष्ठांसाठी `ड्राईव्ह ईन`ची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 12:06 AM2021-05-08T00:06:17+5:302021-05-08T00:06:52+5:30
१८ ते ४४ वयोगटाला नोंदणीसाठी दोन सत्रांत स्लॉट : ज्येष्ठांसाठी `ड्राईव्ह ईन`ची सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबईच्या धर्तीवर खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून गृहसंकुलातील लसीकरण सुरू करण्याचा त्याचबरोबर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ६० वर्षांवरील नागरिकांकरिता ड्राईव्ह इन लसीकरण सुरू करण्याचा निर्णय महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला.
लसीकरण मोहीम प्रभावी व जलदगतीने व्हावी, यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात येणार आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकरिता ड्राईव्ह इन लसीकरण मोहीम राबवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जाणार आहेत. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सकाळी ९ व संध्याकाळी ५ अशा दोन सत्रांत स्लॉट उपलब्ध करुन देण्याचा निर्णयही घेतला आहे. लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, काँग्रेसचे गटनेते दीपाली भगत, भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक विक्रांत चव्हाण, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, संजय हेरवाडे, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजयंती देवगीकर, डॉ. खुशबू टावरी, डॉ. अदिती पवार उपस्थित होते.
सद्यस्थितीत ठाणे शहरात ज्या प्रमाणात लसी उपलब्ध होत आहेत, त्या प्रमाणात सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी सक्तीची असून त्यांना स्लॉट उपलब्ध व्हावा यासाठी सकाळी ९ वा. व सायंकाळी ५ वा स्लॉट देणार आहे. यामुळे जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांना नोंदणी करणे शक्य होईल. ४५ व त्यापुढील नागरिकांना पहिल्या व दुसऱ्या डोससाठी नोंदणी बंधनकारक आहे. परंतु, झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी काही केंद्रावर ऑफलाईन लसीकरण सुविधा देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.
आवारात लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी २० सोसायट्यांचा पुढाकार
nठाणे : शहरातील अनेक केंद्रांवर लसीकरणावरून गोंधळ सुरू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सोसायट्यांत केंद्र सुरू करण्याची मागणी प्रोग्रेसिव्ह ठाणे रेसिडेंटने आयुक्तांकडे केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भागातील सोसायट्यांच्या ठिकाणी इशा नेत्रालयाने लसीकरण करण्याची तयारी दर्शविली असून पालिकेने परवानगी दिल्यास तब्बल २० सोसायट्यांमधील साडेतीन लाख नागरिकांना त्याचा फायदा होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
nठाण्यातील वसंत विहार, लोकपुरम, लोकउपवन, कनकिया आदींसह २० गृहसंकुलांच्या ठिकाणी अशा पद्धतीने
कोरोनाप्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. किंबहुना या लसीकरण केंद्राची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारीदेखील या असोसिएशनने दर्शविली आहे. ठाण्यातील या महत्वाच्या सोसायट्यांमध्ये तब्बल ३ लाख ५० हजारांहून अधिक नागरिकांचे वास्तव्य आहे.
nया भागात केंद्र सुरू करून आम्ही या चळवळीचा भाग बनण्यास तयार आहोत, असेही त्यांनी निवदेनात स्पष्ट केले आहे. इशा नेत्रालयाने लसीकरणाची तयारी दर्शवून आवश्यक ते मनुष्यबळही देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार वसंत विहार क्लब हाऊसमध्ये आम्ही लसीकरण केंद्र उभारू शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने तशा स्वरूपाची परवानगी द्यावी, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.