मासिक पाळीच्या काळात घेता येईल लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:45+5:302021-05-12T04:41:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क स्नेहा पावसकर ठाणे - राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. लस घेतल्यानंतर काहींना ताप, अंगदुखीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
स्नेहा पावसकर
ठाणे - राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. लस घेतल्यानंतर काहींना ताप, अंगदुखीचा त्रास होताे. मात्र असा त्रास होईल या भीतीने अनेकजण विशेषत: महिला लसीकरण सध्या नको असेच म्हणत आहेत; तर काही महिला मासिक पाळीच्या काळात ही लस घेण्याबाबत कचरताना दिसतात. मात्र मासिक पाळीच्या काळात लस घेण्यास काहीच हरकत नाही. फक्त ज्या महिला शारीरिकदृष्ट्या कमजोर आहेत, त्यांनी मात्र काळजी घेऊन लस घेण्यास काहीच हरकत नाही, अशी माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिली.
दि. १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुरू झाले आहे. काहींना लस घेतल्यानंतर त्रास होतो. मात्र गरोदर असलेल्या स्त्रियांना कोविडची लस दिली जात नाही. गर्भारपणात ही लस घेता येत नाही; परंतु ज्या महिलांना मासिक पाळीचा काळ असेल, अशांना ही लस देण्यात काहीच अडचण नाही. फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून अनेक महिला काम करतात. त्यांना रोज घराबाहेर पडणे गरजेचे असते. अशा बहुतांश फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण झालेले आहे. आता मासिक पाळीच्या काळातही महिलांनी लस घेताना निश्चिंत राहण्यास हरकत नाही.
-------------------
गर्भवती महिलांना लस दिली जात नाही. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी आपण जर खात्रीशीर असू की, आपण गरोदर नाही; तर लस घेण्यास अजिबात हरकत नाही. तसेच मासिक पाळीच्या काळातही महिलांना लस घेता येऊ शकेल. मात्र ज्या महिलांना मासिक पाळीच्या काळात अधिक रक्तस्राव होतो किंवा ज्या शारीरिकदृष्ट्या कमजोर आहेत, अशांनी आपल्या तब्येतीचा विचार करून लस घ्यावी. लस घेणे हानिकारक नाही.-
डॉ. अर्चना आखाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ, जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे
------------
गर्भवती महिलांनी आपल्या तज्ज डॉक्टरांशी बोलून लस घेण्याचा निर्णय घ्यावा. तर मासिक पाळीच्या काळात आणि त्यानंतर लस घेता येईल.
डॉ. स्वाती गाडगीळ
--------------
गाइडलाइन
लसीचा गरोदरपणाबाबतचा पुरेसा अभ्यास झालेला नाही, त्यामुळे गरोदर स्त्रियांनी लस घेणे सध्या तरी टाळावे.
स्तनदा मातांनी लस घेण्याबाबत आपापल्या डॉक्टरचा सल्ला घेऊन, बाळाच्या तब्येतीचा विचार करून लस घ्यावी.
मासिक पाळीत लस घेण्यात कोणताही धोका नाही.
----------
चौकट
मासिक पाळीत लस घेतलेल्या काही महिलांशी संवाद साधला असता त्यांपैकी अनेकांना काहीच त्रास झाला नसल्याचे सांगितले. मात्र आधीच ज्यांना रक्तदाब कमी असण्याचा त्रास होतो किंना ॲनिमियाचा त्रास आहे, अशांना थोडा फार त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मासिक पाळीच्या ३-४ दिवसांनी अशा महिलांनी लस घ्यावी, असे डॉक्टर सांगतात. लस घेणे कोणत्याही कारणाने टाळू नये, असेही आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.