वडापावला मिळाली महागाईची फोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 01:21 AM2021-02-09T01:21:27+5:302021-02-09T01:22:28+5:30
तेल, बेसन, गॅस दरवाढीचा परिणाम; गरिबांचा ‘बर्गर’, समाेसा दोन रुपयांनी महागला
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : लाखोंची भूक भागविणारा, सर्वसामान्यांना परवडणारा खाद्यपदार्थ म्हणून ओळख असलेला वडापाव सध्या महागला आहे. ठाण्यातील दुकानांत वडापावचे दर १८ रुपयांपर्यंत, तर हातगाडीवर १५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. सोबतच भजीही पाच रुपयांनी महागली आहे. तेल, बेसन आणि गॅसमध्ये झालेल्या भाववाढीमुळे दर वाढवावे लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वाढीव दरामुळे वडापावचे ग्राहक कमी झाल्याची खंत काही विक्रेत्यांनी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या दरात वाढ होत चालली आहे. १२०० रुपये १५ किलोने मिळणारे तेल चक्क २०००-२२०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर बेसन पीठ, बटाटे, आणि गॅसचे सतत वाढलेले दर यामुळे वडापावच्या दरांत विक्रेत्यांना वाढ करावी लागली आहे. महिन्याभरापासून शहरात बऱ्याच ठिकाणी वडापावचे दर वाढविण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांच्या यादीत प्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे वडापाव. गरिबांची भूक भागविणारा, मध्यमवर्गीयांच्या ऑल टाइम फेव्हरेट या यादीत असणारा, तर श्रीमंतांची चव पुरविणारा हा वडापाव प्रत्येकाच्या पसंतीचा ठरला आहे. गरिबांचा बर्गर म्हणूनही वडापावची ओळख आहे. सकाळ असो की सायंकाळ वडापाव खायला हमखास खवय्यांची गर्दी होत असते. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात गोरगरीब मात्र वडापाव खाऊन आपला दिवस पुढे ढकलतात. खिशाला परवडणाऱ्या या वडापावमध्ये मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढ झालेली दिसून येत आहे. एक रुपयांपासून तीन रुपयांपर्यंत वडापावची वाढ करण्यात आली आहे. कुठे १२, १३, १५, तर कुठे १७ आणि १८ रुपये वडापाव झाला आहे. गाडीवर १५ रुपयांपर्यंत तर दुकानांत १८ रुपयांपर्यंत साधा वडापाव मिळत आहे.
भजी प्लेटही पाच रुपयांनी महागली
वडापावबरोबर भजीलादेखील खवय्यांची मागणी असते. बटाटा भजी, कांदा भजी, मूग भजी, मिरची
भजी, पालक भजी असे विविध प्रकार भजींमध्ये
आहेत. त्यात बटाटा भजी, कांदा भजी, मूग भजी ही सर्वांत लोकप्रिय असल्याने त्या भजीना पसंती दिली जाते.
वडापाव पाठोपाठ भजीचेदेखील दर वाढले आहेत. भजी प्लेट ही प्लेटमागे पाच रुपयांनी वाढविण्यात आली आहे. जिथे २५ रुपये होते तिथे ३० रुपये, तर जिथे ३० रुपये तिथे ३५ रुपये प्लेट भजी मिळत आहे.
वडापाव, भजी पाठोपाठ समोसाचेदेखील दर वाढविण्यात आले आहे. समोसामागे दोन रुपयांची वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
आमच्याकडे वडापाव, समोसा १३ रुपयांवरून १५ रुपयांपर्यंत वाढविला आहे. महागाई हे एकमेव कारण आहे.
- विकास नलावडे
महागाई आणि ग्राहकांचा विचार करून आम्ही फक्त एक रुपयांची वाढ केली आहे. १२ रुपयांवरून १३ रुपयांपर्यंत, तर भजी प्लेट २५ वरून ३० रुपयांपर्यंत झाली आहे. - संतोष बोडके
आमच्याकडे १० रुपये वडापाव होता, तो आता १२ रुपये केला आहे. दर वाढल्यामुळे जिथे १० वडापाव नेत होते, तिथे ८ वडापाव नेत आहेत.
- नरेश वाघमारे
सध्या तरी आम्ही वडापावचे दर वाढविले नाहीत. परंतु, अशीच परिस्थिती राहिली तर एक ते दोन महिन्यांनी दर वाढविण्याचा विचार आहे. - संगीता पितळे