वडापावचे आमिष दाखूवन चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:55 AM2020-01-04T03:55:15+5:302020-01-04T03:55:23+5:30
दोन खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अटक
टिटवाळा : वडापाव आणि चायनिज खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून इयत्ता पाचवीच्या एका विद्यार्थिनीसह अन्य तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन खाद्यपदार्थ विक्रेत्यांना टिटवाळा पोलिसांनी बुधवारी अटक केली. कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तंटामुक्त म्हणून घोषित केलेल्या या गावाला या कृत्यामुळे गालबोट लागले आहे. या घटनेने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी दोन्ही विक्रेत्यांच्या गाड्यांची तोडफोड करून संताप व्यक्त केला.
कल्याण तालुक्यातील टिटवाळ्याजवळ असणाºया एका तंटामुक्त गावातील शाळेत येथील पीडित अल्पवयीन मुलगी शिकायला होती. शाळेसमोरच्या मोकळ्या पटांगणात गावातील वडापाव विक्रेता माधव मगर (३७) आणि चायनिज खाद्यपदार्थ विकणारा विश्वनाथ तरणे (४०) हे व्यवसाय करत होते. शाळेतील पीडित मुलीला, तसेच गावातील अन्य तीन अल्पवयीन मुलींना वडापाव आणि चायनिज खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून ते दोन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते.
३१ डिसेंबर रोजी पीडित मुलीने सतत होणाºया अत्याचाराची माहिती आईला दिली. त्यानुसार, तिच्या आईने या दोघांविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. टिटवाळा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत १ जानेवारी रोजी दोघांंविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी या आरोपींविरुद्ध बलात्कारासह पॉक्सोअंतर्गतही गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. या आरोपींना बुधवारी कल्याण न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तंटामुक्त गाव म्हणून ओळख
संबंधित गाव तंटामुक्त असून, टिटवाळा पोलीस ठाण्यात या गावातील एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची गंभीर घटना समोर आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी दोन्ही आरोपींच्या गाड्यांची तोडफोडही केली.