वडवली भाजी मंडईचा झाला वाहनतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 03:32 AM2018-08-21T03:32:20+5:302018-08-21T03:33:17+5:30
अंबरनाथमधील फेरीवाल्यांनी रस्ता रिकामा केलाच नाही; नियमित देखभालीअभावी दुर्दशा
अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या वडवली मार्केटच्या शेजारच्या मोकळ्या जागेत पालिकेने चार वर्षांपूर्वी खुली भाजी मंडई उभारली होती. स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांसाठी ही जागा देण्यात येणार होती. मात्र, स्टेशन परिसरातील फेरीवाले न उठल्याने ही मंडई केवळ नावापुरती राहिली आहे. आता तर या खुल्या भाजी मंडईचा चक्क वाहनतळ झाला आहे. स्थानिक रहिवासी, तर आपल्या चारचाकी आणि दुचाकी गाड्या येथे पार्क करत आहेत.
अंबरनाथ नगर परिषदेच्या बेजबाबदारपणाचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. अंबरनाथ नगर परिषदेने कोट्यवधींचा खर्च करत वडवली भागात व्यापारी तत्त्वावर वडवली मार्केटची उभारणी केली होती. या वडवली मार्केटमध्ये अनेक गाळे हे पालिकेने भाडेतत्त्वावर दिलेदेखील आहेत. मात्र, या मार्केटची अवस्था आज बिकट झाली आहे. या मार्केटची नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने संपूर्ण मार्केटला गळती लागली आहे. अनेक ठिकाणी प्लास्टर निघाले असून काही ठिकाणी मुख्य पिलरचे स्टीलदेखील गंजलेले आहे. अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्तीच झालेली नाही. मार्केटवरील छत गळत असल्याने संपूर्ण इमारतीलाच धोका निर्माण झाला आहे. इमारतीच्या देखभालीसंदर्भात पत्रव्यवहार करूनही त्याची दुरुस्ती होत नाही. याच इमारतीत पालिकेने स्वत:च्या सफाई कामगारांचे हजेरीशेडही उभारले आहे. कामगारांचा वावर असतानाही ही इमारत दुर्लक्षित राहिली आहे. इमारतीला वीजपुरवठा करणारा बॉक्सदेखील खुला ठेवण्यात आल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इमारतीच्या परिसराची स्वच्छताही नियमित होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असतानाच अंबरनाथ पालिकेने चार वर्षांपूर्वी वडवली मार्केटच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पालिकेचे फिश मार्केट प्रस्तावित केले होते. मात्र, स्थानिक रहिवाशांनी फिश मार्केटमुळे दुर्गंधी पसरेल, या भीतीने त्यास विरोध केला. फिश मार्केटला विरोध झाल्यावर पालिकेने याच मार्केटच्या जागेवर मोठी शेड उभारली. येथे खुली भाजी मंडई उभारण्यात आली. त्याचे उद्घाटनही करण्यात आले. मात्र, खुल्या भाजी मंडईचे उद्घाटन झाल्यापासून एकही भाजीविक्रेता येथे बसलेला नाही.
अंबरनाथ स्टेशन परिसरात भाजीविक्रेते बसत असल्याने त्यांच्यावर कारवाई केल्यावर त्यांना बसण्यासाठी येथे शेड उभारली होती. मात्र, पालिकेने ना भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली, ना भाजीविक्रेते येथे आले. या शेडचा वापर इतर कामासाठीही पालिका प्रशासन करू शकते, याची कल्पना आहे. मात्र, तरीही त्याचा वापर पालिका प्रशासन करत नाही. अनेक वर्षांपासून या शेडचा वापर स्थानिक रहिवासी आपल्या चारचाकी आणि दुचाकी गाडी ठेवण्यासाठी करत आहेत. पावसाळा असो वा उन्हाळा, येथे सर्व शेडही गाड्यांनी भरलेली असते.
जागेच्या पाहणीअंती होणार निर्णय
पालिकेच्या नियोजनशून्य कामाचा फटका या शेडला बसला आहे. या शेडचा वापर पालिकेने आपल्या उपक्रमासाठी करावा. येथे भाजीविक्रेत्यांना जागा दिल्यास स्टेशनवर पडणारा भार कमी होण्यास मदत होईल.
- प्रदीप पाटील, विरोधी पक्षनेते, अंबरनाथ
या जागेची पाहणी करून नव्याने या ठिकाणी काही करणे शक्य असल्यास त्याबाबत विचार केला जाईल. पालिका अधिकारी या जागेसंदर्भात कोणता प्रस्ताव तयार करतात, त्यावरून पुढील निर्णय घेतला जाईल.
- मनीषा वाळेकर,
नगराध्यक्ष, अंबरनाथ