वडवली उड्डाणपूल स्लो ट्रॅकवर
By admin | Published: January 13, 2017 06:52 AM2017-01-13T06:52:01+5:302017-01-13T06:52:01+5:30
आंबिवली रेल्वेस्थानकाजवळील वडवली आणि मोहने या भागांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम
कल्याण : आंबिवली रेल्वेस्थानकाजवळील वडवली आणि मोहने या भागांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सहा वर्षे रखडले आहे. रेल्वेच्या हद्दीतून जाणाऱ्या या उड्डाणपुलाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने वाहनचालकांना सध्या पूर्व-पश्चिमेला जाण्यासाठी येथील रेल्वे फाटकाजवळ तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. या पुलाच्या कामाच्या भूमिपूजनानंतर अन्य ठिकाणच्या पुलांची कामे मार्गी लागली असताना वडवली पुलाला सापत्न वागणूक का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
२०१० मध्ये तत्कालीन महापौर रमेश जाधव यांच्या कार्यकाळात या कामाचे भूमिपूजन झाले होते. हे काम तीन वर्षांत पूर्ण करावयाचे होते. परंतु, आजही हे काम अर्धवट आहे. पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी केडीएमसीकडून कोणत्याही हालचाली होत नाहीत. या पुलाचे काम सुरू केल्यानंतर अन्य उड्डाणपूल आणि स्कायवॉकची कामे हाती घेऊन ती पूर्णही झाली. परंतु, वडवली पुलाचे काम रखडलेल्या स्थितीत असल्याचे चित्र अनेक वर्षे पाहावयास मिळत आहे. या अपूर्ण राहिलेल्या कामामुळे आंबिवली रेल्वेलगत असलेल्या समांतर रस्त्याच्या नूतनीकरणाचे कामही पूर्णत: रखडले आहे. उड्डाणपूल नसल्याने येजा करणारी अवजड वाहने याच समांतर रस्त्यावरून जात असल्याने तेथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता दुरवस्थेच्या गर्तेत सापडला आहे. जागामालकाचे वाद असल्याने काही कालावधीसाठी पुलाच्या कामामध्ये व्यत्यय आला होता.
मात्र, आता वादही संपुष्टात आल्याचे बोलले जाते. मग, कामाला प्रारंभ का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, यासंदर्भात लोकमतने बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद लाभला नाही. (प्रतिनिधी)