वैद्य बंधूंची मलेशियन पोलिसांकडून चौकशी, अपहरणकर्त्यांकडून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:04 AM2018-08-08T03:04:26+5:302018-08-08T03:04:39+5:30
मलेशिया येथे व्यापारासाठी गेलेले रोहन आणि कौस्तुभ वैद्य या दोघा भावांची तेथील अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाली आहे.
डोंबिवली : मलेशिया येथे व्यापारासाठी गेलेले रोहन आणि कौस्तुभ वैद्य या दोघा भावांची तेथील अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाली आहे. ते सध्या मलेशियन पोलिसांच्या ताब्यात असून, १२ तासांपेक्षा जास्त काळ त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण होताच त्यांना दोन दिवसांत डोंबिवली येथे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वैद्य बंधूंचा रॉक फ्रोझन फूड या नावाने फ्रोझन फिश विक्रीचा व्यवसाय आहे. त्यानिमित्त मलेशियातील मीस ली फ्रोझन फूड कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेसाठी गेले असताना आपले अपहरण झाल्याची माहिती त्यांनी वडिलांना फोनद्वारे दिली. अपहरणकर्त्यांनी १ कोटींची मागणीदेखील केली होती. या घटनेनंतर वैद्य कुटुंबियांनी ठाणे खंडणीविरोधी पथकाला याबाबतची माहिती दिली. दरम्यान, मलेशियन पोलिसांनी त्यांची सुटका केली. या दोघांचे अपहरण का केले होते, त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी मलेशियन पोलिसांनी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांचे अपहरण कोणी केले, अपहरणाचे कारण काय, त्यांचे अपहरण कुठून केले, याबाबत वैद्य बंधूंची चौकशी पोलीस करत आहेत. त्यानंतर दोन दिवसांत त्यांना मायदेशी पाठवले जाणार असल्याचे वृत्त आहे.