वायफायला आधार ३२५०० वीजखांबांचा
By admin | Published: November 7, 2015 01:12 AM2015-11-07T01:12:48+5:302015-11-07T01:12:48+5:30
ठाणे शहर वायफायने कनेक्ट करण्यासाठी ठाणे महापालिकेने आता पावले उचलली
ठाणे : ठाणे शहर वायफायने
कनेक्ट करण्यासाठी ठाणे महापालिकेने आता पावले उचलली असून स्मार्ट सिटीचा एक भाग
म्हणून आता संपूर्ण शहर हे
वायफायने कनेक्ट करण्यासाठी ३२ हजार ५०० वीजखांबांचा उपयोग केला जाणार आहे.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पीपीपी म्हणजेच खाजगी लोकसहभागातून राबविला जाणार असून यापैकीच काही पोलवर पहिल्या टप्प्यात ४०० सीसीटीव्ही कॅमेरेही बसविणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी
दिली.
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूक पोलिसांच्या एका कार्यक्रमात ठाणे शहर येत्या सहा महिन्यांत वायफायने कनेक्ट करण्याबरोबरच शहरात १५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने हा प्रकल्प प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी महापालिकेने जोरदार हालचाली सुरू केल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे ठाणे आता लवकरच स्मार्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
५१२ केबीपीएसपर्यंत इंटरनेट फ्री
वायफाय सिस्टीममध्ये ठाणे महापालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नसून महापालिका संबंधित एजन्सीला विद्युत पोल उपलब्ध करून देणार आहे.
त्यानुसार, ज्यांना या वायफायची सुविधा घ्यायची असेल, त्यांना सुरुवातीला १०० रुपये तेही एकदाच मोजावे लागणार आहेत. यामध्ये ५१२ केबीपीएसपर्यंत इंटरनेट फ्री असून त्यापुढील वापरासाठी चार्जेस पे करावे लागणार आहेत. यातून जे उत्पन्न मिळणार आहे, त्यातील कमीतकमी १० टक्के हिस्सा हा पालिकेला मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात ४०० सीसीटीव्ही...
याच माध्यमातून पहिल्या टप्प्यात ४०० सीसीटीव्ही
कॅमेरे लावले जाणार असून यासाठी काही ठिकाणी
विद्युत पोलचा वापर केला जाणार आहे. याचे केंद्र स्थानिक पोलीस ठाणे असणार असून मुख्य केंद्र वाहतूक पोलिसांचे कार्यालय असणार आहे.
महापालिकेला मोफत वायफाय सेवा...
ठाणेकरांवर जरी काही अंशी वायफाय सेवेचा भार पडणार असला तरी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासह रुग्णालये, प्रभाग समिती कार्यालये आदींसह पालिकेच्या सर्व सेवांच्या ठिकाणी ही सेवा मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.