वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक; उल्हासनगरात खड्ड्यात बसून कापला केक
By सदानंद नाईक | Published: September 13, 2024 06:53 PM2024-09-13T18:53:58+5:302024-09-13T18:54:17+5:30
रस्त्यावर खड्डेच खड्डे पडून वाहनचालकासह नागरिक रस्त्यातील खड्ड्याने हैराण झाले.
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-२, खेमानी परिसरातील रस्ते खड्डेमय होऊनही, महापालिकेकडून खड्डे भरले जात नसल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रा. प्रविण माळवे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यातील खड्ड्यात बसून केक कापून महापालिका कारभाराचा निषेध करण्यात आला आहे.
उल्हासनगरातील रस्त्याची दुरावस्था होऊन सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी याचा निषेध केला. तसेच गणेशोत्सवा पूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्याची मागणी केली. त्यानंतरही महापालिका रस्ते चकाचक करू शकली नाही. बाप्पाचे आगमन खड्ड्याच्या रस्त्यातून होऊन विसर्जनही खड्ड्याच्या रस्त्यातून होत असल्याने, गणेशभक्तानी महापालिका कारभाराचे वाभाडे काढून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतासह संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. तसेच खड्डे भरण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची सूचना आयुक्तांना केली. कॅम्प नं-२, खेमानी ते राज्य मार्गकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडून वाहनचालकासह नागरिक रस्त्यातील खड्ड्याने हैराण झाले.
खेमाणी येथील मनपा शाळा क्रं-२४ येथील रस्त्याच्या खड्ड्यात बसून प्रा. प्रवीण माळवे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केक कापून महापालिका कारभाराचे वाभाडे काढले. महापालिका आयुक्तांना गणेशोत्सव पूर्वी रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील जीवघेणे खड्डे भरण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी केली होती. त्यानंतरही रस्त्यातील खड्डे जैसे थे राहिल्याची टीका प्रा. माळवे यांनी केली. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ रस्त्यातील खड्ड्यात केक कापल्याचे प्रा. माळवे म्हणाले. एकूणच शहरात रस्त्याची दुरावस्था होऊन पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली. त्यानंतरही रस्त्यातील खड्डे भरण्याच्या कामाला गती आली नसल्याचा आरोप माळवे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.