उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या ९ ते १० गाड्यांची तोडफोड, गुन्हा दाखल, दोघांना अटक
By सदानंद नाईक | Published: July 4, 2023 06:01 PM2023-07-04T18:01:54+5:302023-07-04T18:09:55+5:30
उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिला आहे.
उल्हासनगर : शहरातील डम्पिंग ग्राऊंड परिसरात पार्किंग केलेल्या कचरा उचळणाऱ्या कोणार्क कंपनीच्या ९ ते १० गाड्यांची तोडफोड केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत ढेरे यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिला आहे. कचरा उचळणाऱ्या गाड्या रात्रीच्या वेळी डम्पिंग ग्राऊंड परिसरात पार्किंग केल्या जातात. सोमवारी रात्री काही गाड्यांची तोडफोड झाल्याचा प्रकार उघड झाल्यावर, एकच खळबळ उडाली. कोणार्क कंपनीच्या व्यवस्थापकाने हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवीत दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी दिली. दुसरीकडे महापालिका आरोग्य विभागाचे सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, प्रभारी मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांना याबाबत काहीएक माहीत नसल्याने, विभागातील सावळागोंधळ उघड झाला.
महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ दीपक जाधव यांनी मात्र कचरा उचळणारऱ्या काही गाड्याची तोडफोड झाल्याची माहिती देऊन हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. ऐन पावसाळ्यात शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्पना महापालिकेची असून शहरातील कचरा नियमित उचलला जात असल्याची माहिती उपायुक्त जाधव यांनी दिली. तसेच महापालिका स्वच्छते बाबत विविध उपक्रम राबवित असल्याने शहर कचरा मुक्त झाल्याचे म्हणाले. कचरा उचळणार्या गाडी तोडफोड प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून यामध्ये अनेकांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.