वांगणी-काराव-पाषाणे पूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 05:01 AM2018-07-20T05:01:29+5:302018-07-20T05:02:35+5:30
कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या पाषाणे जवळील उल्हासनदीवरील वांगणी-काराव पूल धोकादायक झाला आहे.
कांता हाबळे
नेरळ : कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या पाषाणे जवळील उल्हासनदीवरील वांगणी-काराव पूल धोकादायक झाला आहे. हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. पुलाला तडे गेले असून रेलिंगही गायब झाले आहेत. तसेच रस्ताही मोठ्या प्रमाणात खचला आहे, त्यामुळे प्रशासनाने हा पूल धोकादायक घोषित केला आहे. त्यामुळे पूल लवकरात लवकर नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
वांगणी - पाषाणे पूल हा अंबरनाथ तालुक्यात येत असला तरी कर्जत तालुक्यातील कळंब, सालोख, माले, आर्ढे, पाषाणे, खाड्याचा पाडा आदी गावातील नागरिक या पुलावरून प्रवास करतात.
उल्हासनदी बारमाही वाहणारी असल्यामुळे आणि पावसाळ्यात इतर नद्या मिळत असल्याने दुथडी भरून वाहत असते. अशा परिस्थितीत अनेक गावांना जोडणारा हा पूल बांधण्यात आला आहे. सध्या त्याची दुरवस्था झाली आहे.
पुलावरून अवजड वाहनांची वर्दळ असल्यामुळे हा पूल कधीही कोसळू शकतो. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाने पुलाचे स्टक्चरल आॅडिट केल्यानंतर हा पूल धोकादायक असल्याचे घोषित केले आहे. तसेच अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यात आली आहे, अशा प्रकारचे फलकही लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.