ठाण्यांत रंगणार ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’
By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 9, 2023 05:41 PM2023-08-09T17:41:33+5:302023-08-09T17:42:37+5:30
ठाणेकर अनुभवणार माउलींच्या पालखीचा अश्वरिंगण सोहळा.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ओबीसी एकीकरण समिती, महराष्ट्र, ओबीसी प्रतिष्ठान आणि मराठा सेवा संघ, ठाणे यांंच्यावतीने ठाणे शहरातील कोर्ट नाका येथे शनिवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते २ यावेळेत ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माऊलींच्या पालखीचा अश्वरिंगण सोहळा ठाणेकरांना अनुभवता येणार आहे.
टाऊन हॉल येथे ज्येष्ठ पत्रकार, कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचं सुश्राव्य कीर्तन पार पडणार आहे. यावेळी, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे, नाशिक, नगर या जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायातील नामवंत मंडळी एकत्र उपस्थित राहून एक ‘अद्भूत सोहळा’ ठाणेकरांना पाहता येणार आहे अशी माहिती आयोजक मराठा सेवा संघ,ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे व ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले यांनी केले आहे.
‘अवघाचि संसार करिल निधार्र। नामाचा गजर सर्वकाळ॥ या संत नामदेव महाराजांच्या ओवीमध्ये भुतलावर राहणार्या प्रत्येक सुखी संसाराची काळजी वाहिलेली दिसते. यामध्ये समतेचा, विश्व बंधुत्वचा आणि कुटुंब व्यवस्थेचा आनंदी संदेश सहजासहजी पोहचतो. या विचारातून प्रेरीत होत समाजातील सर्व घटकांना ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’ या संकल्पनेतून एकत्र जोडण्याचं कार्य ठाण्यात शनिवारी आयोजित सोहळ्यानिमित्त होणार आहे. यावेळी कोर्ट नाका येथे शासकीय विश्रामगृहाजवळून वारकरी मंडळींच्या वारीला सुरूवात होईल. महिला, पुरुष, मुले पारंपारिक वेशभुषेत हातात दिंड्या - पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, रस्त्यावर रांगोळीचा सडा अशा मंगलमय वातावरणात टाळ-मृदूंगाचा गजर करत वारकरी पुढे सरकतील.
त्यानंतर टॉउनहॉलजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत जवळच उभारलेल्या श्री विठ्ठलाच्या पुर्णाकृती पुुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून सहभागी सर्व सामाजिक संस्था, वारकरी मंडळी आपल्या विविध मागण्यांचे, समस्यांची शिदोरी (पत्र) सोडून ती विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून मायबाप सरकारकडे गार्हाणे मांडणार आहेत. ती पत्रे जिल्हाधिकारी, ठाणे यांंच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत.