आंतरराष्ट्रीय परिषदेतून उलगडणार एल.जी.बी.टी.क्यू.आय.ए +समुदायाचे विविध आयाम
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 14, 2022 04:11 PM2022-09-14T16:11:54+5:302022-09-14T16:12:40+5:30
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील ‘बिईंग मी’ समिती विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व समाज अशा सर्व भागधारकांमध्ये तृतीयपंथीयांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणूकीबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
ठाणे - एल.जी.बी.टी.क्यू.आय.ए + समुदायाच्या समस्यांकडे समाज तसेच देशाने माणुसकीने पहावे, त्यांनाही माणूस म्हणून सर्व मूलभूत हक्क प्राप्त व्हावे, हे साध्य करण्यासाठी समाजाची आणि एकंदरीत देशाची मानसिकता कशी असावी यासंदर्भात राष्ट्रस्तरावर विचारमंथन व्हावे या हेतूने ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय २० सप्टेंबर, २०२२ रोजी ए.व्ही.रूम येथे सकाळी ठीक १० वा. मिश्र माध्यमादूवारे (ऑफलाइन/ऑनलाइन) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करीत आहे अशी माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील ‘बिईंग मी’ समिती विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व समाज अशा सर्व भागधारकांमध्ये तृतीयपंथीयांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणूकीबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या परिषदेच्या परिपूर्णतेसाठी बिईंग मी समितीने तृतीयपंथीयांच्या विकासासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट व्यावसायिक, एल.जी.बी.टी.क्यू.आय.ए+ समुदायातील सदस्य, एल.जी.बी.टी.क्यू.आय.ए+ समुदायाच्या अधिकारांसाठी काम करणारे शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, धोरण-निर्माते यांना या परिषदेत त्यांचे अनुभव, स्वयंअध्ययन आणि स्वयंअध्ययनाने प्राप्त झालेली अंतर्दृष्टी सामायिक करण्यासाठी निमंत्रित केले आहे. बिईंग मी समितीने “एल.जी.बी.टी.क्यू.आय.ए+ समुदायाचा ऐतिहासिक संदर्भ”, या समुदायाने अनुभवलेल्या समस्या आणि आव्हाने, या समुदायासाठी शिक्षण, आरोग्य व रोजगार इत्यादी क्षेत्रात नवीन मानदंड स्थापित करण्याची गरज” या अभ्यासविषयावर आधारित शोधनिबंध सबंध भारतातून निमंत्रित केले आहेत. ही परिषद एल.जी.बी.टी.क्यू.आय.ए +समुदाय समजून घेण्याच्या प्रक्रियेत समाजाला मदत करू शकते.
सदर आंतरराष्ट्रीय परिषदेची उद्दिष्टे:-
अ) एल.जी.बी.टी.क्यू.आय.ए +समुदायासमोरील आव्हाने आणि समाजाकडून त्यांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी पुढाकार
आ) लिंगवैविध्याकडे बघण्याचा भागधारकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न
इ) लिंग ओळख आणि लिंगसमानता याबद्दल व्यापक दृष्टीकोनासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी शैक्षणिक संस्थेच्या योगदानावर चर्चा करणे.
एलजीबीटी आणि दलित हक्क कार्यकर्त्या आणि कवयित्री व स्तंभलेखिका म्हणून परिचित दिशा पिंकी शेख या परिषदेच्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. बिईंग मी समिती आयोजित सदर परिषदेद्वारे आम्ही एल.जी.बी.टी.क्यू.आय.ए +समुदायाच्या सद्यस्थितीबद्द्ल आंतरराष्ट्रीय स्तरावरील विचारमंथन होत असल्याबद्दल आम्हाला अलौकिक आनंद होत आहे. या परिषदेत प्रा.राहुल देशमुख (रोसालिंड फ्रँकलिन युनिव्हर्सिटी शिकागो येथील प्रोफेसर आणि देसी रेनबो पॅरेंट्स अॅण्ड अॅलीजचे सक्रिय सदस्य), सियामा बार्किन कुझमिन स्विस (एलजीबीटीक्यूआयए+ च्या कुटुंबांसाठी आणि मित्रांसाठी, एल.आय.एस.ःँबब तुर्की असोसिएशनमध्ये कार्यरत) यासारख्या काही प्रतिभावंत व्यक्ती स्वानुभाव सामायिक करतील. जगभरातून व देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिग्गज सदर परिषदेत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत . काही उल्लेखनीय नावे नमूद करायची झाल्यास
जेनेसिस कॉस्मेटिक सर्जरीचे डॉ आनंद जोशी, पुणे विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाचे डॉ. साधना नातू, पश्चिम बंगालचे अविनाबा दत्ता, अॅड राज नलगे, अॅडव्होकेट-ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय, मारियो दा पेन्हा (राष्ट्रीय समन्वयक- विविधता आणि समावेश, ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेस), मुकुंदा माला (स्वीकार फाऊंडेशन, तेलंगणा) निलाक्षी रॉय (प्रवक्त्या, स्वीकर इंद्रधनुष्य पालकांच्या) लंडनहून, माया अवस्थी (ट्वीट फाऊंडेशन-सहसंस्थापक सदस्य आणि सह-अध्यक्ष), उर्मी जाधव (ट्विट फाउंडेशन आणि ट्रान्स-लेड डान्सिंग ग्रुपचे संस्थापक- डान्सिंग क्वीन्स) बिराजा (दिल्लीतील लैंगिक विषय संशोधक आणि ट्रेनर) शोभना एस कुमार (क्विअर इंकचे भारतातील पहिले क्वीअर-मालकीचे प्रकाशन गृह- संस्थापक), अक्षय त्यागी (विविधता आणि समावेशन उत्साही) अशा दिग्गजांची नावे घेता येतील.परिषदेच्या समारोपासाठी, विविध क्षेत्रातील लोकांच्या यशोगाथा असतील, वक्त्यांच्या स्वानुभाव कथनाद्वारे ते परिषदेला उजाळा देण्याचे काम करतील.
या पत्रकार परिषदेत संस्थेचे सचिव कमलेश प्रधान, बिईंग मी सल्लागार व सहसचिव मानसी प्रधान, प्राचार्य डॉ.गणेश भगुरे, बिईंग मी सल्लागार व उपप्राचार्या डॉ.संज्योत देऊस्कर, बिईंग मी प्रमुख डॉ.अनिता दक्षिणा वा प्रा.महेश कुलसंगे यांनी सदर आंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती दिली.