रेकॉर्डिंगमध्ये विविध नेत्यांची नावे
By admin | Published: July 9, 2017 01:53 AM2017-07-09T01:53:04+5:302017-07-09T01:53:04+5:30
परिवहन सेवा चालवण्याचा ठेका मिळावा याकरिता २५ लाखांची लाच देणाऱ्या ठेकेदाराला व लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत अटक करवून देणारे
- लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : परिवहन सेवा चालवण्याचा ठेका मिळावा याकरिता २५ लाखांची लाच देणाऱ्या ठेकेदाराला व लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत अटक करवून देणारे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी या दोघांना बोलते करुन या कंत्राटामधील आर्थिक देवाणघेवाणीच्या तपशीलाचे रेकॉर्डिंग करुन ते पोलिसांच्या हवाली केले आहे. या ठेकेदाराने अन्य पक्षाचे नेते, आमदार व नगरसेवक यांना लाच दिल्याचा दावा मेहता यांनी स्वत:च्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. मात्र त्यांची नावे उघड करण्यास त्यांनी ‘लोकमत’कडे नकार दिला.
मेहता यांनी त्या ठेकेदार व लिपीकाला अटक करवून दिल्यानंतर शुक्रवारी रात्रीच भाजपाचे कार्यालयप्रमुख यशवंत आशिनकर यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात ठेकेदाराने अन्य पक्षाचे आमदार, नगरसेवकांना पैसे दिल्याचा दावा केला होता. ते आमदार, नगरसेवक कोण? ते कोणत्या पक्षाचे? असे सवाल केले असता आशिनकर यांनी आपणास नावे सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले. भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी मात्र त्यांची नावे तुम्हाला निवडणुकीत कळतील, असे सांगत भाजपा हा मुद्दा निवडणुकीत तापवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
महापालिकेत निविदा मंजूर करताना भ्रष्टाचार होतो का, असे विचारले असता आ. मेहता यांनी त्यास नकार दिला. मात्र केवळ परिवहन सेवेच्या ठेक्यात लाचलुचपत सुरु असल्याचा त्यांचा दावा असून प्रचारात हा मुद्दा आपण उपस्थित करणार, असे त्यांचे मत आहे.
मीरा भार्इंदर महापालिकेची परिवहन सेवा जीसीसी तत्त्वावर चालवण्यास महासभेने गेल्यावर्षी मंजुरी दिल्यानंतर अनेकवेळा निविदा मागवून प्रतिसाद मिळत नव्हता. दिल्लीच्या शामा शाम सर्व्हिसेस या एकमेव ठेकेदाराची निविदा मंजूर करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली.
२९ जूनच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा नगरसेवकांनी विरोध करुनही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या सदस्यांनी मिळून निविदा मंजूर केली. घाईघाईने प्रस्ताव आणून स्थायी समितीत तो मंजूर करण्यामागे मोठा भ्रष्टाचार असल्याची तक्रार आ. मेहतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याकडे केली होती.
त्यामुळे निवडणुकीत हा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापवण्याचे भाजपाचे मनसुबे यापूर्वीच पक्के झाले होते, असे संकेत प्राप्त होत आहेत. याबाबत आ. मेहता यांनी विचारले असता ते म्हणाले की, परिवहन सेवा चालवणाऱ्या यापूर्वीच्या दोन ठेकेदारांनी महापालिकेचे मोठे नुकसान केले असल्याने भाजपाने या ठेकेदाराबाबत विरोधी भूमिका घेतली होती.
परिवहन सेवा चालवण्याचा ठेका मिळवण्याकरिता आ. मेहता यांना लाच देऊ करणारा ठेकेदार राधेश्याम कथोरिया व पालिकेचा लिपीक आनंद गबाळे यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वीही आ. मेहता यांनी काही ठेकेदारांना अशा पद्धतीने आपल्याकडे बोलावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात दिल्याचे बोलले जाते.