वर्तकनगरला मिळणार वाढीव पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:47+5:302021-07-15T04:27:47+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेने वर्तकनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी ३४ लाख खर्चून आणखी एक २५० ...
ठाणे : ठाणे महापालिकेने वर्तकनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी ३४ लाख खर्चून आणखी एक २५० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या १९ जुलैच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. यामुळे येथील सुमारे ३० हजार नागरिकांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती हद्दीतील धर्मवीरनगर, हिरानंदानी मिडोज, हाईड पार्क, वरुण गार्डन, कनिकया आणि नेहरिका ही गृहसंकुले येतात. या सर्वच गृहसंकुलांमध्ये पालिकेच्या गांधीनगर जलकुंभावरून रोज पाच दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो, तर या जलकुंभावरून आसपासच्या परिसराला १३ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. धर्मवीरनगर परिसरात महापालिकेने बीएसयुपी योजनेंतर्गत नव्या इमारती उभारल्या असून, यामुळे या भागातील पाण्याची मागणी वाढली आहे. परंतु, अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्या पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी सक्षम नाहीत. त्यामुळे या भागाला वाढीव पाणीपुरवठा करणे शक्य होत नव्हते. यातूनच या भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ती सोडविण्यासाठी या भागात २५० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, या कामासाठी ३४ लाख २९ हजार २०० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.