वरुणराजाचे पुन्हा दमदार आगमन; ठिकठिकाणी साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:58 AM2019-07-25T00:58:12+5:302019-07-25T00:58:22+5:30
वृक्षही कोसळले, रेल्वेसेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल, बळीराजा सुखावला
ठाणे : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मंगळवारी रात्रीपासून शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. शहरात १२ ठिकाणी पाणी साचले होते. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या असून, धरणसाठ्यात काही अंशी वाढ झाल्याचे दिसून आले.
शहरात सायंकाळी चारपर्यंत ८३ मिमी पावसाची नोंद झाली होती. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
रेल्वेगाड्याही उशिरा धावत होत्या. सायंकाळनंतर पाऊस ओसरला होता. मागील काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता होती. मात्र मंगळवार रात्रीपासूनच पावसाने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली. बुधवारी सकाळीसुद्धा जोरदार पाऊस बरसत होता. पावसामुळे शहरातील श्रीरंग विद्यालयाजवळ झाड कोसळले, तर आरटीओ आॅफिस येथेही झाडाचा काही भाग कोसळला. मुंब्रा, खारेगाव, दिव्यासह ठाण्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. टिटवाळा, शहाड, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथेही पावसाचा चांगला जोर होता.
या पावसाने बळीराजा सुखावला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिवसभराच्या पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. ठाणे, कल्याण, कसारा, कर्जत येथील गाड्या सुमारे अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले, तर रस्त्यांवर वाहतूककोंडी झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.
मागील २४ तासांत ठाणे जिल्ह्यात सरासरी १०९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. ठाणे तालुक्यात सर्वाधिक ८३ मिमी पावसाची तर, सर्वात कमी मुरबाडमध्ये १ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. उल्हासनगरमध्ये १३ मिमी, कल्याणमध्ये ४.०२ मिमी, भिवंडीत ३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यात मागील २४ तासात पाऊसच झाला नसल्याची नोंददेखील करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाने अजून हवी तशी हजेरी न लावल्याचे आकडेवारीवरून दिसते. मात्र, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागास पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी ५० ते ६० टक्क्यांवर गेल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.