वसई डेपोतील शहरी एसटी वाहतूक बंद
By admin | Published: January 3, 2017 05:30 AM2017-01-03T05:30:21+5:302017-01-03T05:30:21+5:30
एसटी महामंडळाने अखेर नालासोपारा आणि वसई डेपोतून सुरु असलेली शहरी बसवाहतूक रविवारपासून पूर्णपणे बंद केली. वसई विरार महापालिकेने या मार्गावर बससेवा
शशी करपे , वसई
एसटी महामंडळाने अखेर नालासोपारा आणि वसई डेपोतून सुरु असलेली शहरी बसवाहतूक रविवारपासून पूर्णपणे बंद केली. वसई विरार महापालिकेने या मार्गावर बससेवा सुरु करण्यास ठाम नकार दिल्याने सोमवारपासून प्रवाशांचे हाल सुरु झाले. एसटी वाचवण्यासाठी वसईत सर्वपक्षीयांची एकजूट झाली असून मंगळवारपासून आंदोलन सुुरु केले जाणार आहे. तर पालकमंत्र्यांची विनंती परिवहन मंत्र्यांनी धुडकावल्याने भाजपाने सोमवारी धरणे आंदोलन करून आंदोलनात उडी घेतली.
वसई विरार महापालिकेने २०१२ मध्ये परिवहन सेवा सुरु केल्यानंतर एसटीने धोरणानुसार टप्याटप्याने शहरी बस वाहतूक बंद करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसटीने २१ सप्टेंबरपासून वसई आणि नालासोपारा डेपोतील २१ मार्गावरील शहरी बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी महापालिकेने बसेसची संख्या कमी असल्याचे कारण सांगून बससेवा तूर्तास सुरु करण्याची विनंती एसटी महामंडळाला केली होती. त्यानंतर एसटीने सेवा सुरु ठेवली होती. आता एसटीने १ जानेवारीपासून २१ मार्गांवरील बससेवा पूर्णपणे बंद केली आहे. महापालिकेने डेपो आणि बसेसची उपलब्धता नसल्याचे सांगून ही बस सेवा सुरु करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे सोमवारपासून गावागावातून मुंबईला कामावर जाणाऱ्यांची आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय सुुरु झाली आहे. त्यातून याभागातील वातावरण तापू लागले आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून सर्व बस स्टँडवर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील बससेवा सुरु रहावी यासाठी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक, उपाध्यक्ष मनोज पाटील, ग्रामीण अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी गेल्या आठवड्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची मंत्रालयात भेट घेतली होती. त्यावेळी रावते यांनी बससेवा सुरु ठेवण्यास स्पष्ट नकार दिला होता. नियमाविरोधात महामंडळ बस सेवा सुरु ठेवणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी महापालिका बससेवा सुरु करायला तयार नाही. लोकांचे हाल होणार असल्याने तोडगा निघेपर्यंत बसेस सुरु ठेवण्याची विनंती केली होती. असे असतांनाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पालकमंत्र्यांची विनंती धुडकावत बससेवा बंद केल्याने भाजपच्या गोटात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे, बस वाहतूक सुरु रहावी यासाठी भाजपाने महापालिका आयुक्त सतीश लोखडे यांचीही भेट घेतली होती. मात्र, त्यांनीही नकार दिल्याने या मार्गावर कोणतीही बससेवा सुरु झालेली नाही.
गैरसोय लक्षात घेऊन काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर, भाजपाचे उपाध्यक्ष मनोज पाटील, जनआंदोलन समितीचे मिलिंंद खानोलकर, सायमन मार्टीन यांच्यासह अनेक पदाधिकारी हजर होते. बैठकीत एसटी बचाव आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपाने सोमवारी सकाळी जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करून आंदोलनात उडी घेतली. भाजपाचे शिष्टमंडळ मंगळवारी पालकमंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून बस वाहतूक सुरु रहावी यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांकडून कोणताही तोडगा निघाला नाही तर सर्वपक्षीय एसटी बचाव आंदोलन समिती बुधवारपासून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची माहिती समितीच्या डॉमनिका डाबरे यांनी दिली.