वसई ग्रामीण भागातील वीजबिले टेबलावर पडून
By admin | Published: April 23, 2016 01:37 AM2016-04-23T01:37:47+5:302016-04-23T01:37:47+5:30
वसई तालुक्यातील शिरवली, पारोळ, माजीवली, देपीवली, करजोण, तिल्हेर, सायवन, उसगाव, शिवणसई, घाटेघर इ. गावातील वीज ग्राहकांना या महिन्याचे बिल न मिळाल्याने हजारो
विरार : वसई तालुक्यातील शिरवली, पारोळ, माजीवली, देपीवली, करजोण, तिल्हेर, सायवन, उसगाव, शिवणसई, घाटेघर इ. गावातील वीज ग्राहकांना या महिन्याचे बिल न मिळाल्याने हजारो वीज ग्राहकांवर विलंब आकार भरण्याची वेळ आली आहे.
दर महिन्याला ३ तारखेला वीज बिल ग्राहकांच्या हातात येते तर त्या ग्राहकाने ते पंधरा दिवसाच्या आत भरले नाही तर त्या त्यावर विलंब आकारणी होते. या महिन्यामध्ये या सर्व गावातील वीजबिले महावितरणने नवीन ठेकेदार नेमल्याने ती महावितरणच्या कार्यालयातच पडून राहीली. त्यामुळे आता ग्राहकांना पुढील बिलात मागील महिन्याचे बील थकीत दाखविले जाईल व विलंब शुल्क भरणे भाग पडेल.
तसेच दोन महिन्याचे बिल एकदम भरण्याचा भार सोसावा लागेल. यामुळे ग्राहकांत नाराजी व्यक्त होत आहे.
तसेच मागील वर्षी ठेकेदाराच्या चुकीमुळे शेकडो ग्राहकांना लाखो ते हजारोंच्या घरात वीज बिल आले होते. ते कमी करण्यासाठी नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागली होती. पुन्हा तोच धडा नवीन ठेकेदाराने गिरवल्याने पुढच्या महिन्यात किती वीज बिल येईल याचा धसका वीजबिल ग्राहकांनी घेतला आहे. (वार्ताहर)