वसई - ठाणे - कल्याण या पहिल्या टप्यातील जलवाहतुक मार्गावर पहिली बोट धावणार डिसेंबर अखेर, आयुक्त संजीव जयस्वाल यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 05:12 PM2018-03-26T17:12:53+5:302018-03-26T17:12:53+5:30
वसई - ठाणे - कल्याण या जलवाहतुकीच्या पहिल्या टप्यातील पहिली बोट ही डिसेंबर अखेर धावणार असल्याचा दावा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.
ठाणे - ठाणे महापालिकेचा महत्वांकाक्षी ठरलेला आणि मागील कित्येक वर्षे कागदावरच असलेल्या जलवाहतुक प्रकल्पाच्या पहिल्या टप्याच्या कामाला अखेर काही दिवसात सुरु होणार असल्याची हमी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. त्यानुसार डिसेंबर २०१८ पर्यंत वसई - ठाणे - कल्याण या पहिल्या टप्यातील दोन ते बोट सुरु होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ज्या ठिकाणी खोली असेल त्या मार्गावर या बोट धावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर हे खाजगीकरणाच्या माध्यमातून म्हणजेच जीसीसी तत्वावर या बोटी धावतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष म्हणजे वेळ या प्रवासातून वेळ आणि पैशाची बचत तर होणार आहेच, शिवाय वाहतुक कोंडीतून देखील सुटका होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेच्या पूर्वी महाराष्टÑ मेरीटाईम बोर्डचे सीईओ विक्रम कुमार, गोवा आणि कोच्चीचे शीफ यार्डचे अधिकारी तसचे इतर महापालिकांचे अधिकारी देखील उपस्थित होते. पालिका खाडीतून अंतर्गत जलवाहतुक सुरु करणार आहे. पहिल्या टप्यात वसई - मिराभाईंदर - ठाणे कोलशेत, घोडबंदर रोड , साकेत दिवा भिवंडी कल्याण हा २५ नॉटीकल मैल म्हणजेच ४५ किमी लाबींचा ७०मिनिटांचा जलवाहतुक मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यापासून कल्याण, वसई, मीरा - भार्इंदर, भिवंडी, या शहरापर्यंत जलवाहतूक सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली. यासाठी होणारा सुमारे ६५० कोटींचा निधी हा संपूर्णपणे केंद्राकडून मिळणार असल्याने पालिकेचा या कामी पडणारा खर्चाचा ताण कमी होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तर कोलशेत येथे या जलवाहतुकीचे मल्टी मॉडेल हब हे विकसित केले जाणार आहे. ज्या ठिकाणी बोटी दुरुस्त देखील केल्या जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान ठाणे शहराला ३२ किमीचा खाडी किनारा लाभलेला आहे. आता या खाडी किनारा विकसित करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात वसई - मिराभाईंदर-ठाणे-कोलशेत-घोडबंदर रोड - साकेत - दिवा - भिवंडी - कल्याण हा ४५ मिकी लांबीचा ७० मिनिटांचा जलवाहतुक मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. यासाठी सुमारे ६५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यामध्ये निगा देखभाल दुरुस्ती आणि त्यासाठी लागणाऱ्या अनषांगिक सुविधा टिकीट काऊंटर्स, पार्कींग सुविधा, सिग्नल आणि व्हेस्सल मॅनेजमेट कॉस्ट आदी बाबींपकडून यावर होणार खर्च देखील अपेक्षित धरण्यात आला आहे.
त्यानुसार पहिल्या टप्यातील काम सुरु झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ८ ते १० कॅपीसीटीच्या दोन ते तीन बोट घेतल्या जाणार असून त्या डिसेंबर अखेर पर्यंत धावतील असा विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे. ज्या ठिकाणी खाडीची खोली अधिक असेल त्या ठिकाणी या बोट धावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच खाजगी संस्थेच्या माध्यमातून ही सेवा चालविली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी जीसीसीचे कंत्राट केले जाणार आहे.
*खाडीचे प्रदुषण वाढणार नाही
खाडीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रदुषण विरहित इंधनाचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी विविध ठिकाणाच्या जलवाहतुकीचा अभ्यास करण्यात आला असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
दोन दिवसात केंद्रीय जलवाहतुक मंत्र्याकडे होणार सादर डीपीआर
पहिल्या टप्यातील डीपीआर तयार झाला असून त्याचे सादरीकरण दोन दिवसात दिल्लीत होणार असून त्याला तत्वत: मंजुरी मिळेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
*तीन स्तरावर सुरु होणार जलवाहतूक
मालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तीन स्तरावर जलवाहतूक सुरु होणार असल्याने पालिकेला देखील यापासून चांगला महसुल मिळणार आहे. प्रवासी जलवाहतुकीमुळे रस्ते आणि रेल्वेवरील भार कमी होणार आहे. पर्यटनच्या दृष्टीने देखील ठाण्यात जलवाहतुकीचा विकास करण्यात येणार असल्याने पर्यटकांना देखील ठाण्यात येण्यास वाव मिळणार आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्टेशन आणि रोड पासूनचा जलवाहतुक किती अंतरावर असेल याचा देखील अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार वसईला रेल्वे स्टेशनपासूनचे अंतर हे ४ किमी आणि आणि रस्त्याचे अंतर ० किमी असणार आहे. तर कल्याण जेटीचे अंतर हे रेल्वे स्टेशपासून अवघे १.७१ किमी असणार असून रस्त्यापासून ते ५० मीटरवर असणार आहे. तर ठाण्यातील कोलशेतचे हबचे अंतर हे कळवा रेल्वे स्टेश पासून अंतर ५ किमीचे आणि रस्त्यापासूनचे अंतर ७० मीटर असणार आहे.
पालघरला शीपयार्डसाठी प्रयत्न करणार
पालघर येथे शीप यार्ड तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. त्यासाठी येत्या काही दिवसात संबधींत यंत्रणेशी पत्रव्यवहार केला जाणार असून याठिकाणी शीप यार्ड तयार झाल्यास तेथील लोकांना रोजगार देखील उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*रस्त्यावरील ट्राफीक होणार शिफ्ट
या वाहतुकीमुळे शहरात रस्त्यावर होणारी ट्राफीक यामुळे कमी होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. सध्या ठाण्यातील मुख्य चौक हे, वाहनांमुळे गजबजले आहेत. त्यामुळे या वाहनांना किंबहुना खाजगी वाहन चालकांना जलवाहतुकीचा पर्याय दिल्यास अंतर्गत भागात रस्त्यावर होणारी वाहतूक कमी होऊन ठाणेकरांना जलवाहतूकीचा एक उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रवाशांचा देखील मोठा भार यामुळे कमी होणार आहे.
*जलवाहतूक ५० टक्के स्वस्त
रस्ते वाहतुकीच्या तुलनेत जलवाहतूक ही ५० टक्के स्वस्त असणार आहे. त्यानुसार वसईवरुन ते जेसलपार्क या ४ किमीसाठी १३ रुपये, वसई ते घोडबंदर ९ किमीसाठी १६, नागलाबंदर १५ किमीसाठी १९, कोलशेत २६ किमीसाठी २३, कालेºहपर्यंत २७ किमीसाठी २४, अंजुरदिवे ३० किमीसाठी २५, पारसिक बंदर ३१ किमीसाठी २६, डोंबिवली ३९ किमीसाठी २६ आणि वसई ते कल्याण या ४७ किमीच्या अंतरासाठी अवघे २९ रुपये मोजावे लागणार आहेत.
*१० ठिकाणी उभारली जाणार जेटी
जलवाहतुकीचे जाळे पसरवण्यासाठी ठाण्यात १० ठिकाणी जेटी उभारण्यात येणार आहेत. यामध्ये कल्याण, डोंबिवली (ठाकुर्ली गाव), अंजुरदिवे, काल्हेर, पारसिक बंदर, कोलशेत, नागला बंदर, घोडबंदर गाव, मिरा भाईंदर आणि वसई फोर्ट या ठिकाणी या असणार आहेत.
*दुसऱ्या टप्याचे काम करणार नाही - आयुक्तांचे स्पष्टीकरण
दुसऱ्या टप्यात ठाणे, नवी मुंबई, मुंबई याचे काम करण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल ठाणे महापालिकेने केला आहे. पहिल्या टप्यासाठीचा संपूर्ण निधी हा केंद्राकडून मिळणार आहे. परंतु दुसऱ्या टप्यासाठीचा निर्णय अद्याप झालेला नाही. असे असेल तरी ठाणे महापालिका या दुसऱ्या टप्याचे काम ठाणे महापालिका करणार नसल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले.