वसई-विरार पालिका : बांधकाम वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांना सव्वादोन लाख? नगरसेवकाच्या संभाषणाची क्लिप व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 02:26 AM2020-07-11T02:26:51+5:302020-07-11T02:26:56+5:30
नालासोपारा : पूर्वेतील मौजे आचोळे येथील डम्पिंग ग्राउंड आणि मलनि:सारण प्रकल्पासाठी आरक्षित जमिनीवर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सीताराम गुप्ता ...
नालासोपारा : पूर्वेतील मौजे आचोळे येथील डम्पिंग ग्राउंड आणि मलनि:सारण प्रकल्पासाठी आरक्षित जमिनीवर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी शाळेची चार मजली इमारत बांधली आहे. हे बांधकाम वाचवण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना सव्वादोन लाख रुपये दिल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपमुळे उघड झाले आहे. गुप्ता आणि शिवसेना पदाधिकारी प्रमोद दळवी यांच्यातील संभाषणाची ही क्लिप आहे. याआधी दोन-तीन वेळा या इमारतीवर झालेली कारवाई यामुळे वादात सापडली आहे.
आचोळे येथील ३० एकर जमीन डम्पिंग ग्राउंड आणि मलनि:सारण प्रकल्पासाठी विकास आराखड्यात आरक्षित करण्यात आली आहे. संतोष भवन परिसरातील नगरसेवक गुप्ता यांनी यातील सर्व्हे क्र मांक २४ मध्ये गुरुकुल ग्लोबल हायस्कूलचे बांधकाम सुरू केले आहे. याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेने दोन दिवसांपूर्वी बांधकामावर कारवाई केली. मात्र, क्लिप व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई तकलादू असल्याचे उघड झाले आहे.
आॅडिओ क्लिपमध्ये नगरसेवकाने केलेले आरोप खोटे आहेत. न्यायालयाने दिलेली कारवाईवरील स्थगिती उठवण्यासाठी मी स्वत: प्रयत्न केला आहे. त्या जागेत देवाच्या मूर्ती असल्याने कारवाई करण्यात अडचण येत होती. त्या हटवण्यासाठी नोटीस दिली आहे. मूर्ती हटवल्या नाही तर स्वत: हटवून बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई करणार आहे.
- मनाली शिंदे, सहायक आयुक्त, ‘ड’ प्रभाग, वसई-विरार महापालिका