ठाणे: वसंत विहार शाळेचा पालकांच्या डोक्यावर २६ टक्के फी वाढीचा बोजा; पालिका प्रशासनाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:15 PM2022-01-31T18:15:19+5:302022-01-31T18:18:09+5:30
या तुघलकी निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना काळात आधीच रोडावलेल्या आर्थिक स्थितीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना ठाण्यातील प्रसिद्ध वसंत विहार शाळेने तब्बल २६ टक्के फी वाढ पालकांच्या माथी मारली आहे. शाळा प्रशासनाच्या या तुघलकी निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणी पालिकेनेही वसंत विहार शाळेला नोटीस बजावली असून हा निर्णय मागे न घेतल्यास पालकांच्या साथीने उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.
दीड वर्षे लाॅकडाऊनमध्ये शाळा बंद होत्या. या काळात ऑनलाईन वर्ग सुरु होते. मात्र तरीही अनेक खासगी शाळांना पालकांना जाचक पद्धतीने फी वसुलीसाठी तगादा लावला होता. हा प्रकार एकीकडे सुरु असतानाच वसंत विहार शाळेने पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची २६ टक्के फी वाढ यंदाच्या शैक्षणिक वर्षात केली. कोरोना काळात घर चालवण्यासाठी तारेवरची कसरत सुरु असताना वाढीव फी भरणे पालकांना शक्य नसल्याने त्यांनी याप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांची भेट घेतली. पालकांच्या शिष्टमंडळाची बाजू ऐकून पाचंगे यांनी शाळा प्रशासनाशी पत्रव्यव्हार केला. शेकडो पालकांचा या निर्णयाला विरोध असून याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा, असेही पाचंगे यांनी शाळा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले.
याबाबत ठाणे पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशीही पाचंगे यांनी चर्चा करून निवेदन दिले. शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांनी वसंत विहार शाळेला नोटीस बजावली असून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत दहीतुले यांनी शाळेला शालेय फी ननियामुसार काम करण्याचे आदेश शाळेला दिल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.
राज्य शासनाच्या नियमावलीला केराची टोपली दाखवत खासगी शाळांचा मनमानी कारभार सुरु आहे. वसंत विहार शाळेनेही पाल्यांची एकरकमी फी भरण्याचे निर्देश पालकांना दिले आहेत. कोरोना महामारीदरम्यान अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांची दोन - दोन मुले या शाळेत शिकत असताना इतकी मोठी रक्कम फी रूपाने एकत्रित भरणे पालकांना शक्य नसल्याने 'एकरकमी फी भरणा' अट शाळेने तात्काळ रद्द करावी असे पाचंगे यांनी सांगितले.