वसंतराव नाईकांचा शपथविधी दिवस ‘बंजारा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 09:28 PM2017-12-03T21:28:00+5:302017-12-03T21:30:36+5:30
वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदी ५ डिसेंबर रोजी शपथ घेतली होती. हाच दिवस आता यापुढे बंजारा गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त वाशिमच्या पोहरादेवी येथे एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा बंजारा समाजाचे नेते वसंतराव नाईक यांनी ५ डिसेंबर १९६३ रोजी महाराष्टÑाच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली होती. त्यानंतर, त्यांनी ११ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवून राज्याचा नावलौकिक वाढवला. शिवाय, अखिल बंजारा समाजाला देखील प्रगतीपथाची दिशा दाखवली. याच दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय बंजारा समाज ५ डिसेंबर हा दिन ‘बंजारा समाज गौरव दिन’ म्हणून साजरा करणार आहे. या गौरव दिनाची मुहूर्तमेढ बंजारा पोहरादेवी (जिल्हा वाशीम) येथील भक्तिधामात ५ डिसेंबर रोजी रोवली जाणार आहे. समाजातील सर्वपक्षीय नेते यानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार असल्याची माहिती बंजारा धर्मपीठाचे संस्थापक किसन राठोड यांनी दिली.
राठोड यांनी ठाण्यातील समाजबांधवांना दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, राज्याला हरितक्र ांतीचा मार्ग दाखवणाºया नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळला, तेव्हा महाराष्ट्राची स्थिती अत्यंत बिकट होती. त्याच काळातील दुष्काळ म्हणजे महाराष्ट्रावर आलेले अस्मानी संकट होते. मात्र, त्याही बिकट परिस्थितीतून मार्ग काढून त्यांनी राज्यात हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत संपन्न केले. शेती आणि समाज परिवर्तनासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून दोघांनाही परिवर्तनाच्या मार्गावर नेले. अशाच समाजभूषण वसंतराव नाईक यांचा ५ डिसेंबर हा शपथविधी दिवस यंदापासून अखिल भारतीय बंजारा समाज गौरव दिवस म्हणून साजरा करणार आहे. या दिवसाची मुहूर्तमेढ बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील बंजारा भक्तिधाम येथून रोवण्यात येत आहे. या वेळी भव्य रॅलीचे आयोजन केले असून ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता पोहरादेवी भक्तिधाम ते नाईकांचे जन्मस्थळ पुसदमार्गे गहुली स्मृतिस्थळ गौरवभूमी येथे रॅली जाईल. स्मृतिस्थळावर वसंतराव यांना अभिवादन करण्यात येईल. दुपारी भक्तिधाम येथे समाज गौरव दिन सोहळा होईल. या सोहळ्यात समाजातील सर्वपक्षीय नेते तसेच विचारवंत एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामध्ये किसन राठोड, महसूलमंत्री संजय राठोड, माजी मंत्री मनोहर नाईक, मखराम पवार, माजी आमदार धोंडीराम राठोड, आमदार हरिभाऊ राठोड, प्रदीप नाईक, तुषार राठोड आणि बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष राजूसिंग नायक आदी उपस्थित राहणार आहेत.
-------
एसटी प्रवर्गात समाविष्ट करा - राठोड
समाज गौरव दिन सोहळ्यात समाजाच्या आगामी काळातील संघर्षाची दिशा ठरवणार असल्याचे किसन राठोड यांनी सांगितले. समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून जातीच्या दाखल्यांसाठी १९६१ पूर्वीची रहिवासी पुरावा अट रद्द करावी. तसेच मुंबईत बंजारा भवनसाठी जागा मिळावी, अशा प्रमुख मागण्या या सोहळ्यातून सरकारपुढे ठेवण्यात येणार आहेत. आगामी काळात समाज स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत असून त्याबाबतदेखील विचारमंथन केले जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
.....