मुसळधार पावसामुळे वासिंद पूर्व-पश्चिम रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:45+5:302021-07-20T04:27:45+5:30
आसनगाव : शहापूर तालुक्यातील वासिंद शहराच्या पूर्व-पश्चिम भागातून जात असलेल्या मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा लोहमार्गाच्या ब्रिटिशकालीन पाणीवाहक मार्गिकेमुळे पश्चिमेच्या ...
आसनगाव : शहापूर तालुक्यातील वासिंद शहराच्या पूर्व-पश्चिम भागातून जात असलेल्या मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा लोहमार्गाच्या ब्रिटिशकालीन पाणीवाहक मार्गिकेमुळे पश्चिमेच्या सुमारे ४२ गावांना याही पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.
गावांना वासिंद शहराशी जोडण्यासाठी ठेवलेले रेल्वे फाटक काही वर्षांपासून बंद केल्याने लोहमार्गातील नाल्यावर बांधलेल्या पुलाखालून येथील गावांमधील रहिवाशांना ये-जा करावी लागते. ब्रिटिशांनी रेल्वे मार्गाची उभारणी करताना बांधलेला पूल नाल्यातील पाण्याचा निचरा होण्याकामी बांधला होता. पण, छोट्या रेल्वेपुलाखालून प्रवास करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायही नसल्याने शहापूर आणि कल्याण तालुक्यातील ४२ गावांतील रहिवासी याच पाणी भरलेल्या पुलाखालून कित्येक वर्षे प्रवास करीत आहेत. शनिवारपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पुलाखालून तुडुंब पाणी भरून वाहत आहे. त्यामुळे तब्बल ४२ गावांचा संपर्कच तुटल्याचे दिसत आहे. भातसई, शेई, शेरे, अंबर्जे, मढ, हाल, बावघर, मासवणे, आंबिवली तसेच कल्याण ग्रामीण तालुक्यातील वेहळे, काकडपाडा, पळसोळी, गेरसे, कोसले, फळेगांव, उशिद, रुंदे आणि इतर गावपाड्यांचा यात समावेश असून या लहान पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यातूनच दुचाकी व चारचाकी वाहने वाट काढून पुढे जात आहेत. दरम्यान, विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने वासिंदच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते बांधकाम मंत्रालयाने एकूण २५२ मीटर उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी ३१.५० कोटी रुपये मंजूर करूनन बांधकाम सुरू केले. पुलाचे काम डिसेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. डिसेंबर २०१९ पर्यंत हा पूल पूर्णत्वास नेण्याचे निर्धारित केले हाेते. मात्र, अद्याप ते पूर्ण न झाल्यामुळे हाल सुरूच आहे.