वेदांतमध्ये चार नव्हे, पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा; उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 01:02 AM2021-04-27T01:02:24+5:302021-04-27T01:02:34+5:30
नातेवाईकांचा आरोप, उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा ठपका
ठाणे : वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात सोमवारी अवघ्या १२ तासांमध्ये चार कोविड रुग्णांचे मृत्यू झाल्याचा दावा केला जात असला, तरी यात चार नव्हे, तर पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा अन्य एका रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच विठ्ठल राठोड यांचाही मृत्यूही झाल्याचा आरोप दिलीप राठोड यांनी केला आहे.
वेदांत रुग्णालयात अतिदक्षता विभागात ५३ रुग्ण दाखल होते. त्यातीलच अरुण शेलार (५१), वरुणा पासते (६७), दिनेश तानकर (४१) आणि विजय पाटील (५७) या चौघांचाच मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय आणि ठाणे पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, सोमवारी ११.३० वाजण्याच्या दरम्यान विठ्ठल राठोड या अन्य एका रुग्णाचाही मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाइकांना सांगण्यात आले. विठ्ठल हे सोमवारी पहाटेपर्यंत चांगले होते. अगदी रविवारीही त्यांची प्रकृती चांगली होती. त्यांची ऑक्सिजन पातळीही चांगली होती. मग त्यांचा अचानक मृत्यू कसा झाला, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडल्याचा संशय राठोड यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
आठ तास उलटूनही मृतदेहाची प्रतीक्षा :
या चार जणांचे सकाळी मृत्यू झाल्यानंतर दुपारी ४ पर्यंत नातेवाइकांना मृतदेह ताब्यात देण्यात आले नसल्याचीही तक्रार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. त्यावेळी हे मृतदेह कोविडचे असल्यामुळे थेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेले जातात, परंतु कोणाचीही अडवणूक रुग्णालयाने न करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.
महापालिकेकडून सकाळी ऑक्सिजन मिळालेला होता : डॉ. अजय सिंग
ज्या चार जणांचा मृत्यू झाला त्यातील एक रुग्ण १७ दिवसांपासून ॲडमिट होता. फुप्फुसात इन्फेक्शन अधिक झाल्यानेच त्यांची कॅपिसिटी कमी होऊन त्यांची प्रकृती खालावून या चार रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, असे वेदांत हॉस्पिटलचे रुग्णालय प्रमुख डॉ. अजय सिंग यांनी सांगितले. चाैकशी समितीपुढे आम्ही जे काही पुरावे सादर करायचे आहेत, ते आम्ही सादर करू. महापालिकेकडूनही आम्हाला सकाळी ऑक्सिजन मिळालेला होता, असे त्यांनी सांगितले.
कारवाई मागणी
रात्री माझे नातेवाईक चांगले होते, त्यांची ऑक्सिजन लेव्हल ९७ एवढी होती. रात्री ते माझ्याशी बोलले. जेवलेदेखील, असे असताना अचानक रुग्णालय प्रशासनाने तुमच्या नातेवाइकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर या रुग्णालयात काम करणाऱ्यांनी आम्हाला फोन करून तुमच्या नातेवाइकाचा मृत्यू ऑक्सिजन संपल्यानेच झाल्याचे सांगितले. त्यामुळेच यामध्ये रुग्णालय प्रशासनाची चूक असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या नातेवाइकांनी केली.