सांडपाण्यावरील भाजीचे मळे उखडले; नरेश म्हस्के यांचेसमवेत सहाय्यक आयुकतांची धडक मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 03:26 PM2020-01-24T15:26:59+5:302020-01-24T15:27:52+5:30
महापालिका कार्यक्षेत्रात बहुतांशी ठिकाणी विशेषत: रेल्वे ट्रॅकजवळच्या मोकळ्या जागेत भाजीचे मळे आहेत.
ठाणे : रेल्वे ट्रॅक नजीकच्या जागेत तसेच ठाणे शहरातील विविध ठिकाणी भाजीचे मळ्यात भाजीपाल्यांसाठी मलमूत्रमिश्रित सांडपाणी वापरले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, याबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी गेल्या आठवड्यात सर्व सहाय्यक आयुक्तांची बैठक घेवून असे प्रकार ज्या ठिकाणी होत असतील त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते, त्यानुसार आज वर्तकनगर प्रभागसमितीच्या सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित यांनी महापौर नरेश म्हस्के यांचेसमवेत धडक मोहिम हाती घेवून आज समतानगर येथील पाण्याच्या टाकीजवळील भाजीमळ्यांवर कारवाई केली. यावेळी नागरिकांच्या जीविताशी खेळणा-या सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेश महापौरांनी यावेळी दिले.
महापालिका कार्यक्षेत्रात बहुतांशी ठिकाणी विशेषत: रेल्वे ट्रॅकजवळच्या मोकळ्या जागेत भाजीचे मळे आहेत, याठिकाणी बोअरवेलकिंवा विहीर असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मात्र पिकांसाठी मलमूत्रमिश्रीत सांडपाणी तसेच गटाराचे पाणी वापरण्यात येते. अशाप्रकारच्या भाजीपाल्याचे सेवन केल्यामुळे अनेक दुर्धर आजार फैलावत आहे व याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना नसते. अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी भाजीमळे आहेत, या सर्व ठिकाणची पाहणी व मातीचे नमुने घेवून यामध्ये दोषी आढळल्यास संबं धतांवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनास दिले होते, त्यानुसार समतानगर येथील भाजीमळ्यामध्ये प्रशासनाच्यावतीने आज कारवाई करण्यात आली.
रस्त्याखालून पाईपलाईन टाकून संपूर्ण भाजीमळ्याला सांडपाणीच पुरवित असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी असलेली विहीर केवळ देखाव्यापुरती असून संपूर्ण मळ्याला सांडपाणीच वापरले जात आहे अशी कबुली देखील संबं धि त मळे मालकांनी दिली. ही बाब अत्यंत गंभीर व धोकादायक समतानगर येथील संपूर्ण मळा व आजूबाजूचे चार मळे जेसीबीच्या सहाय्याने उखडून पाईपलाईन देखील काढून टाकण्यात आली. यावेळी नाल्यावर बसविलेले पंप देखील प्रशासनाने जप्त केलेले आहेत. अशा प्रकारची कारवाई सातत्याने सुरू ठेवून ज्या ज्या ठिकाणी सांडपाण्यावर भाजीमळे असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.
कारवाईपूर्वी महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने या ठिकाणी वापरण्यात येणारे पाणी, माती व भाजीचे नमुने घेवून त्यांची शास्त्रोक्त पध्दतीने तपासणी केली. या तपासणीत वापरण्यात येणारे पाणी हे सदोष असल्याचे आढळून आल्यानंतर समतानगर येथे ही कारवाई करण्यात आली असल्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. चारुशीला पंडित यांनी यावेळी सांगितले. अशा प्रकारे मानवी जीवनाशी अप्रत्यक्षरित्या अवहेलना करणाऱ्या सर्व संबधितांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 376 अ प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असून पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे. यावेळी शिवसेना विभागप्रमुख राजेंद्र फाटक, संदीप डोंगरे नंदू पिसाळ आदी उपस्थीतीत होते.