ठाण्यात भाज्यांचे दर प्रचंड कडाडले; ग्राहकांच्या खिशाला चाट, हमाली महागली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 03:39 AM2020-07-02T03:39:39+5:302020-07-02T03:40:10+5:30
१० दिवस संपूर्ण ठाणे लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे बुधवारी ठाणेकरांनी जांभळीनाका येथील मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती.
ठाणे : अनलॉक दोन जाहीर झाल्यानंतर ठाणे महापालिकेने मात्र संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी भाजी मार्केटमध्ये ठाणेकरांची गर्दी झाली होती. ती पाहून विक्रेत्यांनी भाज्यांचे दर अचानक वाढवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी विके्रत्यांनी २० रुपयांची कोथिंबिरीची जुडी ८० रुपयांना विकल्याचे दिसून आले. इतर भाज्यांचे भावही दुप्पट ते तिप्पट दराने ते विकत होते. मात्र, वाहतूक आणि हमालांचे दर वाढल्यानेच भाजीचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर पुढील १० दिवस लॉकडाऊन असल्याने ते लूट करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला.
उद्यापासून १० दिवस संपूर्ण ठाणे लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे बुधवारी ठाणेकरांनी जांभळीनाका येथील मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. परंतु, भाज्यांचे वाढलेले दर पाहून त्यांची झोपच उडाली. प्रत्येक भाजीचे दर हे दुप्पट ते तिप्पट झाल्याने ते हवालदिल झाले होते. आधीच तीन महिन्यानंतर कामाला कुठे सुरुवात झाली होती, पगार कमी झाले आहेत, काहींच्या नोकऱ्यादेखील गेल्या आहेत. अशातच आता विविध वस्तूंच्या वाढत्या दरांमुळे ठाणेकर हैराण झाले. चार दिवसांपूर्वी २० रुपये असलेले दर ४० ते ८० च्या घरात गेले आहेत.
भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत, व्यापाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण नाही, शासनाने या वाढणाºया दरांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु, त्याकडे त्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. - प्रकाश ताम्हाणे, ग्राहक ठाणेकर
रोजपेक्षा जास्तीचे दर आकारले जात आहेत. गुरुवारपासून बंद असल्यानेच विक्रेते लूट करीत आहेत. - प्रतिभा माने, गृहिणी, ठाणेकर
१० दिवस लॉकडाऊन होणार म्हणून भाज्यांचे दर वाढवलेले नाहीत. तर वाहतूक आणि आणि हमालांचे दर हे दुप्पट ते तिप्पट झाल्यानेच आमचा नाईलाज असून यामुळेच भाज्यांचे दर वाढलेले आहेत. -भाजी विक्रेते, जांभळीनाका मार्केट
आजचे भाज्यांचे दर (रुपयांमध्ये)
भाजी - पूर्वी - आता
कोबी ३० - ५०
शिमला मिर्ची ५० - ८०
टॉमेटो ३० - ८०
भेंडी ४० - ६०
गवार ६० - ८०
कोथिंबीर २० - ८०
शेपू ३० - ४०
काकडी २० - ४०
मेथी २० - ४०
पालक १० - २०