गणेशोत्सवात ठाण्यात वाहन नोंदणीचा उच्चांक, ८ हजार ६०० नवीन वाहनांची नोंदणी
By अजित मांडके | Published: September 30, 2023 06:09 PM2023-09-30T18:09:14+5:302023-09-30T18:09:59+5:30
पेट्रोल वाहनांकडे अधिक कल
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नेहमी गुढीपाडवा, दसरा, दिवाळी या सणाच्या मुहूर्तावर नव्या वाहन खरेदीसाठी वाहन चालकांचा कल दिसून येतो. मात्र यंदा गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वाहन खरेदीबरोबर नोंदणीला वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.
सप्टेंबर महिन्यात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात तब्बल आठ हजार ६०० वाहनांची नोंदणी झाली असून हा गणेशोत्सवातील उच्चांक असल्याचे बोलले जात आहे. तर पर्यावरण पूरक वाहन खरेदी करा अशी जनजागृतीवर भर दिला जात असताना, अजून पेट्रोल आणि डिझेल वाहन खरेदीकडे कल असल्याचे दिसत आहे. या वाहनांमध्ये ५ हजार ४२७ वाहने पेट्रोल आणि एक हजार २४२ डिझेलच्या वाहनांचा समावेश आहे. तर २५३ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात ( आरटीओ ) मध्ये १ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर दरम्यान ८ हजार ६०० विविध वाहनांची नोंदणी झाली आहे. एकूण २० प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी,चारचाकी आणि बस ,ट्रक आदींचा समावेश आहे. तसेच ही पेट्रोल,डिझेल, इलेक्ट्रिक, सीएनजी, एलपीजी, सोलर या इंधनावर धावणारी आहेत. त्या वाहनांमध्ये प्रवासी किंवा मालवाहतूक वाहनांचा समावेश आहे. एकूण वाहनांच्या ५ हजार वाहने ही दुचाकी आहेत. २ हजाराहून अधिक चारचाकी (कार), ३७८ रिक्षा, ६३ बसेस आदी वाहनांचा समावेश आहे.
पेट्रोलची सर्वाधिक वाहने- या महिन्यात नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये ५ हजार ४२७ वाहने पेट्रोलवर धावणारी आहेत. यामध्ये ४ हजार ५८६ दुचाकी, ८०३ कार, ३ रुग्णवाहिका अशी वाहनांचा समावेश आहे. तर १ हजार २४२ डिझेल वाहने असून त्यामध्ये ७२५ मालवाहतूक,३७१ कार ,४३ बसेस अशा वाहने आहेत.
२५३ इलेक्ट्रिक वाहने- अजून पेट्रोल- डिझेल या वाहनांची मोठया संख्येत खरेदी केली जात आहे. त्यातुलनेत इलेक्ट्रिक वाहन खरेदीची संख्या कमी आहे. अवघ्या २५३ वाहने खरेदी करून नोंदणी झाली आहे. यामध्ये १९१ दुचाकी,२० बसेस आणि दोन रिक्षा २९ मोटरकार आदी वाहनांचा समावेश आहे. तसेच सीएनजी वाहनांची संख्या ही ४६१ इतकी असून त्यामध्ये सर्वाधिक ३७५ रिक्षा आहेत.